दुष्काळामुळे हर्सुल रस्ता रुंदीकरणास एका वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी...!
दुष्काळामुळे हर्सूल रस्ता रुंदीकरणास एक वर्षाची मुदतवाढ द्या; पश्चिम बाजूच्या नागरिकांची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29 (डी-24 न्यूज) :- हर्सूल परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753-एफच्या रस्ता रुंदीकरणासाठी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, तसेच सन 2025 मध्ये करण्यात आलेल्या अधिकृत सर्वेक्षणानुसार रस्त्याचे मूळ अलाइनमेंट कायम ठेवावे, अशी मागणी हर्सूल गावातील पश्चिम बाजूच्या नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसंदर्भात संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सन 2025 मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना 100-100 फूट अंतरावरील मालमत्तांवर निशाणी केली होती. या निशाणीनुसार रस्ता रुंदीकरणास नागरिकांचा विरोध नसून, नियोजित रुंदीकरण समान पद्धतीने करण्यात यावे, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
मात्र, अलीकडील काळात मूळ मंजूर अलाइनमेंटमध्ये बदल करून पश्चिम दिशेकडे अधिक जागा संपादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे पश्चिम बाजूच्या सामान्य, गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांच्या घरांचे, व्यवसायांचे आणि मालमत्तांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही नागरिकांनी निवेदनात नमूद केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी हर्सूल परिसराच्या पश्चिम दिशेला रस्ता रुंदीकरण करताना अपेक्षेपेक्षा अधिक जागा घेण्यात आल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील पंचनाम्याची प्रतही निवेदनासोबत जोडण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हर्सूल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, जामा मस्जिद, मोठे हनुमान मंदिर, संत रोहिदास महाराज मंदिर, ऐतिहासिक दर्गा, मशीद, जुनी ऐतिहासिक विहीर आणि मुस्लिम समाजाचे कब्रस्तान यांसारखी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत. या वास्तूंचे संरक्षण व्हावे आणि आवश्यक असल्यास उड्डाणपुलाचा पर्यायही गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये सन 2025 च्या अधिकृत सर्वेक्षणानुसार अलाइनमेंट कायम ठेवणे, कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक दबावाखाली रस्त्याची दिशा बदलू नये, अलाइनमेंट बदलण्यामागील कारणांची स्वतंत्र चौकशी करावी आणि पश्चिम बाजूच्या नागरिकांवर अन्याय होऊ नये, यांचा समावेश आहे.
तसेच, दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण असताना रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आज दुपारी हे निवेदन विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री नगरविकास विभाग यांना पाठवले आहे.
निवेदनावर काँग्रेसचे मोईन शेख हर्सुलकर, पुंडलिक सुरे, काळे मामा, आकाश बडोदे, प्रभाकर बकले, अरूण पाईकडे, किसन सुरे, संतोष वाणी, हेमलाल धुपे, अरुण औताडे, महादू परदेशी, मनोज धुपे, दिपक बडोदे, नजीर शेख, अमोल वाणी, मुजीब शेख, शेख नसीरुद्दीन यांची
सही आहे.
What's Your Reaction?