सिडकोत भरदिवसा तरुणाचा खून, पोलिस घटनास्थळी दाखल, आरोपींचा शोध सुरू
छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोत भरदिवसा तरुणाचा खून; बंटी दीक्षित यांची हत्या, आरोपी फरार
आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22 (डि-24 न्यूज) : शहरातील सिडको परिसरात बळीराम पाटील हायस्कूलजवळील मंगेश गॅस एजन्सी परिसरात एका तरुणाची भरदिवसा हत्या झाल्याची घटना गुरुवारी समोर आली. बंटी दीक्षित असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला संबंधित तरुणाचा अपघात घडवून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्याच्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण आणि घटनेत सहभागी असलेल्या आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच एन-७ सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा व पुढील तपासाची कार्यवाही सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृत बंटी दीक्षित यांचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याची माहिती आहे.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे सिडको परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एन-7 सिडको पोलीस करीत आहेत.
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात...
सिडको परिसरातील बजरंग चौकाजवळ गुरुवार, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका तरुणाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (35 वर्ष), सिडको एन-7 असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात पवन पराशर हा संशयित आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बंटी दीक्षित हे गुरुवारी सकाळी सिडको परिसरातील जीममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते. जीममध्ये व्यायाम करुन ते दुचाकीवर घराकडे परतत असतांना त्यांच्या मागावर असलेल्या पवन पाराशर याने बजरंग चौकातील मंगेश गॅस एजन्सीसमोर कारने प्रथम धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, बंटी दीक्षित हे हवेत उडून खाली कोसळले. तर त्यांची दुचाकी जवळपास 50 ते 60 फूट लांब जावून पडली होती. बंटी दीक्षित यांना कारने धडक दिल्यानंतर पवन पाराशर हा कारने चौकातून यु-टर्न घेऊन पुन्हा अपघातस्थळी आला. व त्याने कारमधून लाकडी दांडा काढून बंटी दीक्षित यांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बंटी दीक्षित यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर संशयित आरोपी पवन पराशर स्वतः वाहन घेऊन सिडको पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त रत्नाकर येवले, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरुन आवश्यक ते पुरावे गोळा केले. शहरातील गजबजलेल्या बजरंग चौक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला
आहे.
What's Your Reaction?