डॉ.ए.ए.कादरी यांच्या मेंटल हेल्थ सेंटरतर्फे मेंटल हेल्थ वीकचे आयोजन ... विविध स्पर्धा

 0
डॉ.ए.ए.कादरी यांच्या मेंटल हेल्थ सेंटरतर्फे मेंटल हेल्थ वीकचे आयोजन ... विविध स्पर्धा

डॉ. ए. ए. कादरी यांच्या मेंटल हेल्थ सेंटरतर्फे ‘मेंटल हेल्थ वीक 2026’चे आयोजन...

मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; सुमारे 300 विद्यार्थ्यांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 5 (डी-24 न्यूज) : मानसिक आरोग्याबाबत जनजागृती वाढविण्यासोबतच मानसिक आजारांबाबत असलेला सामाजिक कलंक दूर करण्याच्या उद्देशाने डॉ. ए. ए. कादरी यांचे मेंटल हेल्थ सेंटर, पडेगाव यांच्या वतीने ‘मेंटल हेल्थ वीक 2026’चे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. ए. ए. कादरी यांचे मेंटल हेल्थ सेंटर हे छत्रपती संभाजीनगर शहरातील मानसिक आरोग्य सेवा आणि जनजागृतीसाठी कार्यरत असून, मानसिक आरोग्याबाबत शिक्षण, जनजागृती तसेच सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.

दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. यंदाचा जागतिक मानसिक आरोग्य दिन WHOच्या ‘Lived Experience Heard — Real Voice, Real Change’ या संकल्पनेनुसार विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान विविध स्पर्धा

या उपक्रमाचा एक भाग म्हणून 5 ते 10 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘मेंटल हेल्थ वीक 2026’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांसाठी आतापर्यंत सुमारे 300 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

5 ऑक्टोबर — वादविवाद स्पर्धा

6 ऑक्टोबर — पोस्टर मेकिंग स्पर्धा

7 ऑक्टोबर — नाट्य / स्किट स्पर्धा

8 ऑक्टोबर — वक्तृत्व स्पर्धा

9 ऑक्टोबर — रील स्पर्धा

10 ऑक्टोबर — जागतिक मानसिक आरोग्य दिन, ‘खुशियाँ’ कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ

या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, मानसिक आजारांविषयी असलेले गैरसमज, भावनिक स्वास्थ्य, नातेसंबंध, सामाजिक जबाबदारी तसेच मानसिकदृष्ट्या अधिक निरोगी समाजाच्या निर्मितीबाबत आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.

‘खुशियाँ’ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

10 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध कथाकथनकार आणि Story Archaeologist लक्ष्मण महेश्वरी यांचा ‘खुशियाँ’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या कथाकथनातून आनंद, मानवी भावना, नातेसंबंध, जीवनातील अनुभव, आत्मचिंतन आणि मानसिक स्वास्थ्य या विषयांना स्पर्श केला जाणार आहे.

समारोप कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. वादविवाद, पोस्टर मेकिंग, नाट्य/स्किट, वक्तृत्व आणि रील स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार असून, ‘खुशियाँ’ कार्यक्रमादरम्यान पारितोषिक वितरण केले जाणार आहे.

‘खुशियाँ’ हा कार्यक्रम “Individual as the Workplace” या संकल्पनेशी जोडला जाणार असून, मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा विषय आहे, हा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. ए. ए. कादरी यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow