मंत्रीपदासाठी काय झकमारली मला माहित, मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर हशा पिकला...

 0
मंत्रीपदासाठी काय झकमारली मला माहित, मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर हशा पिकला...

मंत्रीपदासाठी काय झकमारली, मला माहित’; संघर्ष सांगताना संजय शिरसाटांच्या वक्तव्याने सभेत हशा...

सतीश चव्हाण यांच्या प्रचारसभेत अतुल सावे यांच्यावरही मिश्कील टोला; महायुतीच्या एकजुटीचा केला उल्लेख

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5 (डी-24 न्यूज) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारसभेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या राजकीय प्रवासातील संघर्षाचा उल्लेख करताना, “मंत्रीपदासाठी काय झकमारली, मला माहित,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने सभेत हशा पिकला. सतीश चव्हाण यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली असून निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 

राजकारणात टिकायचे असेल आणि निवडणूक जिंकायची असेल, तर अनेक प्रकारच्या अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो, असे सांगत शिरसाट यांनी आपल्या राजकीय प्रवासातील विविध अनुभव सांगितले. “सतीश चव्हाण यांची निवडणूक आहे म्हणून मी येथे आलो आहे. चालणाऱ्या दुकानाचे उद्घाटन मी करतो आणि मी केलेले भाकीत खरे ठरते,” असा मिश्कील उल्लेखही त्यांनी केला.

अजित पवार महायुतीत येतील, तसेच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असे आपण यापूर्वीच भाकीत केले होते, असा दावा शिरसाट यांनी केला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका करत, त्यांच्या वक्तव्यांवरून राजकीय उदाहरणे दिली.

‘चार वेळा आमदार झालो, मंत्री एकदाच’

“मी चार वेळा आमदार झालो. मला पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र मी पडलो नाही. मंत्री होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला,” असे शिरसाट म्हणाले. याच संघर्षाचा संदर्भ देताना आपल्या तोंडून ‘झकमारली’ हा शब्दप्रयोग त्यांच्या तोंडातून निघाला.

‘मी चारदा आमदार, एकदाच मंत्री; अतुल सावे तीनदा आमदार, तीनदा मंत्री’

यावेळी संजय शिरसाट यांनी मंत्री अतुल सावे यांच्यावरही मिश्कील टोला लगावला. “अतुल सावे तीन वेळा आमदार झाले आणि तीन वेळा मंत्री झाले, तर मी चार वेळा आमदार झालो आणि एकदाच मंत्री झालो,” असे म्हणत त्यांनी सभेत हशा पिकवला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपही महायुतीसोबत असल्याचा उल्लेख करत भाजपकडे प्रत्येक मताचे गणित असल्याचे शिरसाट म्हणाले. “अतुल सावे यांना सांभाळा, ते डेंजर माणूस आहेत,” असे सांगत सावे यांनी आपल्याला ‘काका’ म्हटल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. “काकांचा पुतण्या फार डेंजर आहे, त्यामुळे सतीश चव्हाण यांनी त्यांना सांभाळा,” असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.

‘महायुतीच्या विजयासाठी एकजुटीने काम करा’

महाविकास आघाडीच्या उमेदवारावर टीका करताना शिरसाट यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. सतीश चव्हाण यांच्यामागे अजित पवारांची ‘पुण्याई’ असल्याचा उल्लेख करत, महायुतीतील नेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

“जो त्यांच्या सोबत राहील तो मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विश्वासाचा उल्लेख केला. तसेच, आपल्या राजकीय यशामागे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.

‘सतीश चव्हाणच प्रचाराचे नियोजन करू शकतात’

मराठवाड्यात 76 तालुके असून एवढ्या मोठ्या मतदारसंघात प्रचाराचे योग्य नियोजन सतीश चव्हाणच करू शकतात, असे शिरसाट यांनी नमूद केले. “माझा मतदारसंघ अवघा 20 किलोमीटरचा आहे, तरीही मी 30 टक्के मतदारांपर्यंत पोहोचतो,” असे त्यांनी सांगितले.

प्रचारासाठी 18 दिवसांचा कालावधी असून त्यात दसरा आणि दुष्काळाची परिस्थिती असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचार यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सतीश चव्हाण यांना चौथ्यांदा विजयी करणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन शिरसाट यांनी पदवीधर मतदारांना केले. “कार्यकर्ते आहेत म्हणून आपण आहोत. कार्यकर्त्यांच्या बळावरच आपण निवडणूक जिंकतो,” असा संदेश त्यांनी सतीश चव्हाण आणि कार्यकर्त्यांना दिला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow