नासेर नजीर खान यांची 9 महीन्यात घरवापसी, एमआयएमला दिली सोडचिठ्ठी
नासेर नजीर खान यांची 9 महिन्यांत घरवापसी; एमआयएमला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये पुनरागमन
रेहाना रियाज चिस्ती यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25 (डि-24 न्यूज) : जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसवर नाराज होऊन एमआयएममध्ये प्रवेश केलेले नासेर नजीर खान यांनी अवघ्या नऊ महिन्यांत पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्राच्या सहप्रभारी आणि मराठवाड्याच्या निरीक्षक रेहाना रियाज चिस्ती यांच्या हस्ते नासेर नजीर खान यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे नासेर नजीर खान नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी एमआयएममध्ये जाहीर प्रवेश केला होता. मात्र, आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर हा पक्षप्रवेश झाल्याचे सांगितले जात आहे.
नासेर नजीर खान हे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य इम्रान प्रतापगढी यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे त्यांच्या काँग्रेसमधील पुनरागमनाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पक्षप्रवेशावेळी अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे सचिव साजिद कुरेशी, सय्यद नदीम सौदागर, जावेद खान पठाण, फिरोज खान आणि शोएब शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?