सतीश चव्हाण आमदार बनण्याच्या लायकीचे नाहीत, यावेळी पदवीधरांनी त्यांना धडा शिकवावा - आमदार प्रशांत बंब

 0
सतीश चव्हाण आमदार बनण्याच्या लायकीचे नाहीत, यावेळी पदवीधरांनी त्यांना धडा शिकवावा - आमदार प्रशांत बंब

सतीश चव्हाण आमदार बनण्याच्या लायकीचे नाहीत; यावेळी पदवीधरांनी त्यांना धडा शिकवावा – प्रशांत बंब

18 वर्षांत केलेले एक तरी काम दाखवा; स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोप... सतीश चव्हाण यांनी दिलेल्या पत्राला उत्तर देत म्हणाले मी त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून पत्र पाठवले ते माध्यमांसमोर म्हणत आहेत ते मी वाचले नाही सध्या निवडणूक आहे म्हणून ते वाचले असले तरी बोलणार नाही...

गंगापूर (शेंदुरवादा), दि. 29 (डी-24 न्यूज) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या 18 वर्षांत पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी काय काम केले, हे त्यांनी जनतेसमोर मांडावे. त्यांनी स्वार्थाचे राजकारण केले असून, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचे राजकारण केले आहे. त्यामुळे यंदा पदवीधर मतदारांनी त्यांना धडा शिकवावा आणि परिवर्तन घडवावा अशी जोरदार टीका भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली.

गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बंब बोलत होते. यावेळी त्यांनी सतीश चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

आमदार बंब म्हणाले की, सतीश चव्हाण गेल्या 18 वर्षांपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र, त्यांनी पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नेमके काय काम केले, हे त्यांनी सांगावे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले? पदवीधरांच्या रोजगारासाठी कोणते प्रयत्न केले? याची माहिती त्यांनी सार्वजनिक करावी.

‘एक तरी काम दाखवा, नाहीतर मी माझी कामे दाखवतो’

सतीश चव्हाण यांनी आपल्या 18 वर्षांच्या कार्यकाळातील कामांची श्वेतपत्रिका काढून ती जनतेसमोर सादर करावी. मी चार वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो आहे. दर पाच वर्षांनी मी केलेल्या कामांची आणि पुढील काळात करणार असलेल्या कामांची माहिती जनतेसमोर ठेवतो, असेही बंब यांनी सांगितले.

सतीश चव्हाण यांनी नातेवाईकांना कंत्राटे मिळवून देण्यासाठी आणि स्वतःच्या शैक्षणिक संस्थांना फायदा करून देण्यासाठी राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांना माझे खुले आव्हान आहे, त्यांनी केलेले एक तरी काम दाखवावे; अन्यथा मी केलेली कामे जनतेसमोर दाखवतो, असे बंब म्हणाले.

सतीश चव्हाण यांनी विविध पक्षांमध्ये प्रवेश करून स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोप करत, मी अशा प्रकारचे राजकारण करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून काम करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या उमेदवारीबाबत बंबांचे मौन

भाजपचा उमेदवार द्यायचा की नाही, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार मी काम करणार आहे, असे प्रशांत बंब यांनी स्पष्ट केले. मात्र, महायुतीकडून सतीश चव्हाण यांनाच उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या प्रचारासाठी जाणार का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. तसेच सतीश चव्हाण आपल्याला प्रचारासाठी बोलावणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

या वक्तव्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

दरम्यान, सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेंदुरवादा गटात आमदार प्रशांत बंब यांनी दुष्काळी पाहणी केली. गुरुधानोरा येथे त्यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी हिम्मत हारू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळण्याची अपेक्षा असून, जिरायती शेतीसाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये, निमबागायतीसाठी 27 हजार रुपये आणि बागायतीसाठी हेक्टरी 36 हजार रुपये मदत मिळणार असल्याचे बंब यांनी सांगितले. या मदतीच्या रकमेत वाढ होऊ शकते; मात्र ती कमी होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

सरकारने मुदतीपूर्वीच राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. शाळा व महाविद्यालयांची परीक्षा फी माफ करण्याची कार्यवाही केली जाणार असून, कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, वीज आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असून, जनावरांसाठी चारा छावण्याही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींकडून चारा छावण्या आणि पाण्याच्या व्यवस्थेबाबत ठराव मागविण्यात येणार असल्याचेही बंब यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्यावर टीका

गंगापूर तालुक्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दुष्काळी दौऱ्यावरही प्रशांत बंब यांनी टीका केली. विरोधकांकडून दुष्काळी मदतीवर टीका केली जात असली तरी सरकारने मुदतीपूर्वीच दुष्काळ जाहीर केला आहे, असा दावा त्यांनी केला.

एनडीआरएफकडून साधारणपणे 15 ऑक्टोबरनंतर पाहणी केली जाते आणि त्यानंतर केंद्र सरकारकडून मदतीची प्रक्रिया अपेक्षित असते. मात्र, दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यापूर्वीच दुष्काळ जाहीर करून पंचनामे सुरू केले आहेत, असे बंब यांनी सांगितले.

शेंदुरवादा येथे शेंद्रा-बिडकीन-ढोरेगाव ग्रीनफिल्ड रस्त्याबाबतही बैठक घेण्यात आली. या प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन आमदार प्रशांत बंब यांनी दिले.

या संपूर्ण दौऱ्यात त्यांनी दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश चव्हाण यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow