एचपीव्ही लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करणार - महापौर समीर राजूरकर
एचपीव्ही लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करणार, महापौर
शाळा, शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा , आयुक्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत समाजात पसरलेल्या अफवा आणि गैरसमज दूर करण्यासाठी महानगरपालिका तसेच खासगी शाळांच्या मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांची स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे. शिक्षक, पालक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती करून मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करावे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी केले.
संत एकनाथ रंगमंदिर येथे आज सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने ‘एचपीव्ही लसीकरण : गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचविण्याचा नवा पर्याय’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आणि खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच आरोग्य सेवक-सेविका यांच्यासाठी आयोजित या कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, आरोग्य सभापती डॉ. सुनीता साळुंके, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भांबरे, आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड आदी उपस्थित होते.
महापौर समीर राजूरकर म्हणाले की, गर्भाशयमुखाचा कर्करोग हा महिलांच्या आरोग्यापुढील गंभीर प्रश्न आहे. या आजारामुळे देशात दरवर्षी हजारो महिलांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे एचपीव्ही लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक माहितीच्या आधारे पालकांचे प्रबोधन करावे. या मोहिमेत सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याची गरज आहे.
यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, नगरसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आपापल्या प्रभागांमध्ये तसेच धार्मिक व सामाजिक स्थळांच्या माध्यमातून पालकांचे प्रबोधन करावे. एचपीव्ही लसीकरणाबाबत पसरलेले गैरसमज दूर करून मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. या कार्यशाळेच्या माध्यमातून जनजागृतीसाठी पुढाकार घेणाऱ्या शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे म्हणाले की, महानगरपालिकेच्या शाळांमधील सुमारे 300 वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक तसेच खासगी शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. तोपर्यंत प्रशासनाच्या वतीने विविध माध्यमांतून एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यावर भर दिला जाईल.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही इच्छुक आणि पात्र मुलींना महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी माहिती दिली. त्यामुळे पालकांनी अधिकृत आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेऊन लसीकरणाबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण महत्त्वाचे...
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची जवळपास सर्व प्रकरणे उच्च-जोखमीच्या एचपीव्ही संसर्गाशी संबंधित आहेत. योग्य वयात दिलेली एचपीव्ही लस या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे.
भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, ग्लोबोकॅन 2022 च्या अंदाजानुसार भारतात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची दरवर्षी सुमारे १.२७ लाख नवीन प्रकरणे आढळतात, तर सुमारे 79,900 महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो. ही आकडेवारी या आजाराचे गांभीर्य अधोरेखित करते.
एचपीव्ही लसीकरणाबाबत पालकांनी अफवा किंवा अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता डॉक्टर आणि अधिकृत आरोग्य यंत्रणेकडून मार्गदर्शन घ्यावे. मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरणाबाबत जनजागृती करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.
या कार्यशाळेला शिक्षक, मुख्याध्यापक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी झालेल्यांनी एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याची भूमिका व्यक्त केली.
यावेळी वेणुताई चव्हाण कन्या प्रशाला या शाळेतील 14 ते 15 वर्षातील वयोगटातील ज्या विद्यार्थिनींनी लस घेतलेली आहे त्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
What's Your Reaction?