मराठवाड्यातील दोन विद्यार्थ्यांचा नेक्स्टप्ले एआय " प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर चमकला, 25 लाखांची संशोधनवृत्ती

 0
मराठवाड्यातील दोन विद्यार्थ्यांचा नेक्स्टप्ले एआय " प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर चमकला, 25 लाखांची संशोधनवृत्ती

मराठवाड्यातील दोन विद्यार्थ्यांचा 'नेक्स्टप्ले - एआय' प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर चमकला !

25 लाखांची संशोधनवृत्ती प्रदान.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी सॅमसंग, भारत सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि आयआयटी-दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिष्ठित 'सॅमसंग सॅाल्व्ह फॅार टुमारो' राष्ट्रीय नाविन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धेत, छत्रपती संभाजीनगर येथील आदिश अभिजित शेळके आणि भाग्यश्री मीना यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या **'नेक्स्टप्ले - एआय' या शोधप्रकल्पाला 25 लाख रुपयांची इनक्युबेशन संशोधनवृत्ती जाहीर झाली आहे.

राष्ट्रीय स्तरावर यश: दिल्ली येथे सन्मान

देशभरातून 20 हजारांहून अधिक युवा संशोधकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यातून निवडलेल्या केवळ चार सर्वोत्कृष्ट प्रकल्पांमध्ये 'नेक्स्टप्ले - एआय'चा समावेश झाला. या यशाबद्दल आदिश आणि भाग्यश्री यांना नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात ₹1 लाख रोख रक्कम आणि सॅमसंग एआय फोन देखील प्रदान करण्यात आला.

या संशोधनवृत्तीमुळे, हे दोघे आता आयआयटी (दिल्ली) मधील 'फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नोलॉजी ट्रान्सफर' (FITT) येथे या प्रकल्पावर पुढील संशोधन आणि विकास करणार आहेत. आयआयटी-दिल्ली त्यांना या कामासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन पुरवेल. विशेष म्हणजे, या चार विजेत्यांमध्ये हे दोघे महाराष्ट्रातील एकमेव प्रतिनिधी आहेत.

क्रीडा क्षेत्रातील क्रांती घडवणारा 'एआय' प्रकल्प

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे संगणकशास्त्र विद्यार्थी असलेले आदिश आणि भाग्यश्री यांनी सादर केलेला 'नेक्स्टप्ले - एआय' प्रकल्प 'क्रीडा क्षेत्रात तंत्रज्ञानातून सामाजिक बदल' या विषयावर आधारित आहे.

या अभिनव कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रकल्पाचा उद्देश भारतातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील 92% दुर्लक्षित व उपेक्षित क्रीडा प्रतिभांना शोधण्यासाठी एक प्रभावी मार्ग तयार करणे हा आहे. या संशोधनामुळे देशातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध लागल्यास, भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठी क्रांती घडून पुढील दशकात ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या यशात लक्षणीय वाढ होण्याची क्षमता आहे. हे संशोधन विकसनशील देशांसाठी एक दिशादर्शक ठरू शकते.

आदिश शेळके डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक प्रा. डॉ. अभिजित सुखदेव शेळके आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. माधवी शेळके यांचे सुपुत्र आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी हे संशोधन अत्यंत प्रेरक आणि गौरवास्पद मानले जाते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow