अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या घरावर चालणार बुलडोझर - पोलीस आयुक्त प्रवीण पवार
नाशिकमध्ये कारवाई; अमली पदार्थ प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक
19 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- अमली पदार्थ विरोधी मोहिमेत गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून मुख्य सूत्रधारासह तिघांना नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 19 लाख 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा इशारा पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.
जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 28/2026 अन्वये एनडीपीएस अॅक्टसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख अश्फाक शेख इसाक (राहणार रविंद्रनगर, शाहाबाजार, छत्रपती संभाजीनगर) हा फरार होता.
दि.18 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी नाशिक येथे लपून बसल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने वडाळा नाका परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना शिताफीने पोलिसांनी तात्काळ पकडले.
अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये
शेख अश्फाक शेख इसाक
पठाण दाऊद मुनावर खान (रा. बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर)
सरफराज मिऱ्या हाफिज बेग (रा. शाहाबाजार, छत्रपती संभाजीनगर)
यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान 14 लाख रुपयांची व्होक्सवॅगन कार, 4 लाख 74 हजार 500 रुपये रोख रक्कम तसेच 70 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल हँडसेट असा एकूण 19 लाख 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा करत आहे.
शहरात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू असून नागरिकांनी कोणतीही माहिती संबंधित पोलीस ठाणे, डायल 112 किंवा मोबाईल क्रमांक 9226514001 वर द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
What's Your Reaction?