मोंढ्यात गोडतेल ऑईल रिफायनरीवर एफडिएच्या कारवाईने खळबळ, जवळपास 3 कोटींचा मुद्देमाल जप्त...!
मोंढा परिसरातील ऑईल रिफायनरीवर एफडीएच्या कारवाईने खळबळ...
लाखो लिटर तेलासह जुने 15 लिटरचे डब्बे केले जप्त...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) -अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी, 13 जुलै रोजी पैठण रोडवरील बगाडिया ऑईल मिलवर कारवाई करीत 2 कोटी 93 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंगळवार, 14 जुलै रोजी जुना मोंढा परिसरातील पुष्कर ऑईल रिफायनरीवर छापा मारला. या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने लाखो रुपये किंमतीचे खाद्यतेल आणि 15 किलो वजनाचे सिल जुने डब्बे जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून एफडीएच्या पथकाने शहरातील जुना मोंढा परिसरात अभिनय सिनेमागृहाच्या पाठीमागे असलेल्या पुष्कर ऑईल मिलवर मंगळवारी दुपारी छापा मारला असता धक्कादायक चित्र दिसून आले. तिथे जुन्या आणि वापरलेल्या टिनच्या डब्यांमध्ये पुन्हा तेलाचे रिपॅकिंग केले जात असल्याचे निदर्शनास आले. अतिशय घाणेरड्या वातावरणात तेलाचे उत्पादन केले जात असल्याने यंत्रसामग्रीवर धूळ, गंज, कोळीष्टके दिसून आली. दुर्गंधीयुक्त तेलाचे टब उघड्यावर ठेवलेले होते. बंद पडलेला रिफायनरी विभाग आणि सध्या सुरू असलेला रिपॅकिंग विभाग एकाच ठिकाणी असल्याने संसर्गाचा मोठा धोकाही दिसून आला. अस्वच्छता तर होतीच पण नियम धाब्यावर बसवल्याचेही दिसले. स्वतःची प्रयोगशाळा नव्हती. तेलाचे विश्लेषण अहवाल, तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती काहीही नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पंचनाम्यात नमुद केले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी ऑईल मिलवर कारवाई केल्याने शहराच्या विविध भागात घाण्याने तेल काढून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे
त.
What's Your Reaction?