महीलांची छेड काढणाऱ्या टवाळखोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, काढली आरोपिची धींड

महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, काढली आरोपीची धिंड...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.12(डि-24 न्यूज)
शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या बन्सीलालनगरमध्ये गेल्या 20 दिवसांपासून महिला व तरुणींची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दुचाकीवर येऊन तरुणींना नको त्या ठिकाणी स्पर्श करून छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गजानन दत्ताराव गडदे (22 वर्ष), रा. हट्टा पाटील, ता. सेनगाव जि. हिंगोली, ह.मु. कैलास नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेस्टेशन रोडवरील बन्सीलालनगर हा परिसर उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो. याच परिसरात विविध शाळा-महाविद्यालये असल्याने तसेच खासगी कोचिंग क्लासेस असल्याने या भागात विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. या भागातील अनेक रहिवाशांनी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह तयार केल्याने या भागात अनेक महाविद्यालयीत तरुण, तरुणी राहतात. गेल्या 15 ते 20 दिवसापासून गजानन गडदे हा दुचाकीवर या भागात फिरत होता. रस्त्याने एकटी जाणारी महिला अथवा तरुणी दिसल्यास तो तिच्या पाठीमागून जावून नको त्या ठिकाणी स्पर्श करुन छेड काढत होता. या प्रकारामुळे परिसरातील महिला व तरुणींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
दरम्यान, काही तरुणींनी हिम्मत करुन पोलिसात तक्रार दिली होती. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त संपत शिंदे, वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव मोरे, रणजीत फुलाने, संगीता गिरी, डोईफोडे आदींच्या पथकाने तांत्रिक तपास करुन गजानन गडदे याच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दुचाकी क्र. MH-38-T-3649 जप्त केली आहे.
What's Your Reaction?






