शहरातील पाणीपुरवठा 12 तास खंडित, महापालिकेचे आवाहन
शहरातील पाणीपुरवठा 12 तास खंडित
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या 100 व 26 दलली योजनेअंतर्गत नवीन जायकवाडी पंपगृह येथे शुक्रवारी (दि. 21 फेब्रुवारी 2026) सकाळी 9.45 वाजता वीजपुरवठ्यात अचानक ट्रिपिंग झाल्याने पंपिंग व्यवस्था ठप्प झाली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे 422 अश्वशक्ती व 3750 अश्वशक्ती क्षमतेच्या पंपगृहातील संपूर्ण पंपिंग बंद पडले.
तत्काळ महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इनकमर पॅनल, ट्रान्सफॉर्मर व विद्युत उपकरणांची तपासणी केली असता 1600 केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर क्रमांक 2 मधील ‘प्रेशर रिलिज व्हॉल्व्ह’मधून ऑइल बाहेर पडल्याचे निदर्शनास आले. उत्पादक कंपनी मे. ट्रान्सडेल्टा ट्रान्सफॉर्मर्स प्रा. लि. यांच्या अभियंत्यांकडून सखोल तपासणी करण्यात आली असता ‘ऑन लाईन टॅप चेंजर’मध्ये बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले.
आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन नवीन फरोळा पंपगृह येथील अतिरिक्त 2000 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर तातडीने जायकवाडी पंपगृह येथे आणण्यात आला. 1600 केव्हीए ट्रान्सफॉर्मर क्रमांक 2 डिस्कनेक्ट करून त्याजागी 2000 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर जोडण्यासाठी बस कपलर व केबल कनेक्शनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या बिघाडामुळे दुरुस्तीकरिता 100 व 26 दलली योजनेचा पाणीपुरवठा शनिवार (दि. 21 फेब्रुवारी 2026) सकाळी 9.45 वाजल्यापासून रात्री 9.45 वाजेपर्यंत सुमारे 12 तास बंद राहिला. या कालावधीत योजनेंतर्गत पाणीउचल पूर्णपणे ठप्प होती. नवीन 2000 केव्हीए ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर पंपिंग मशीनरी पुन्हा सुरू करण्यात येणार असून, काम पुढील सुमारे दोन ते अडीच तासांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, या कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा काही काळ विस्कळीत राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?