सामाजिक संघटना म्हणून देशात परिवर्तन घडवणार, शिक्षण, न्यायव्यवस्था, बेरोजगारीवर भर - अभिजित दिपके
सामाजिक संघटना म्हणून देशात परिवर्तन घडवणार; शिक्षण, न्यायव्यवस्था व बेरोजगारीवर भर – अभिजित दिपके
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज) – काॅक्रोच जनता पार्टी ही राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर सामाजिक संघटना म्हणून देशातील विविध क्षेत्रांत सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्य करणार असल्याची घोषणा संस्थापक अभिजित दिपके यांनी पत्रकार परिषदेत केली. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर संघटितपणे लढा देऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, असा दावा करत दिपके यांनी दोन दिवस चाललेल्या कार्यकारिणी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संघटनेचा पुढील कृती आराखडा जाहीर केला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, देशाचा विकास हा कोणत्याही एका व्यक्तीभोवती केंद्रित न राहता लोकशाही मूल्यांवर आधारित असला पाहिजे. महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारधारेवर संघटनेचे कार्य चालणार आहे.
शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याचा निर्धार
संविधानाने प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा अधिकार दिला असला तरी शिक्षणाचे वाढते बाजारीकरण चिंताजनक असल्याचे दिपके म्हणाले. केजीपासूनच खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण आणि कोचिंग क्लासेसचा आर्थिक बोजा सर्वसामान्य कुटुंबांवर पडत असल्याने परवडणारी व दर्जेदार शिक्षण व्यवस्था उभी करण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.
लोकशाही व्यवस्थेत सुधारणा आवश्यक
निवडून आलेले लोकप्रतिनिधी नंतर पक्षांतर करतात, त्यासाठी विविध प्रकारची आमिषे किंवा तपास यंत्रणांचा दबाव वापरला जात असल्याचा आरोप करत दिपके यांनी या प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले.
न्यायव्यवस्था, माध्यमे आणि बेरोजगारीवरही लक्ष
सामान्य नागरिकांच्या प्रकरणांना न्यायालयात वेळ मिळत नसल्याची भावना वाढत असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकविण्यासाठी आवश्यक सुधारणा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून स्वायत्तपणे काम करणे आवश्यक असून, माध्यमांना अधिक स्वातंत्र्य मिळावे यासाठीही संघटना प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील मोठ्या प्रमाणातील युवक उच्चशिक्षित असूनही बेरोजगार असल्याचे सांगत त्यांनी रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि युवकांना सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संघटना विविध स्तरांवर पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.
शिक्षणासाठी विद्यार्थी आणि पालकांना कर्जबाजारी व्हावे लागत असल्याची खंत व्यक्त करत परवडणारे, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांसाठी उपलब्ध शिक्षण व्यवस्था उभी करण्यासाठी व्यापक जनआंदोलन राबविले जाईल. राजकीय पक्ष स्थापन करण्याऐवजी सामाजिक संघटना म्हणून देशात परिवर्तन घडविण्याचा निर्धार युवकांच्या बळावर पूर्ण केला जाईल, असा विश्वास अभिजित दिपके यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?