एसआयआर प्रक्रीयेला निवडणूक आयोगाची मुदतवाढ...
एसआयआर प्रक्रीयेला निवडणूक आयोगाची मुदतवाढ....
मुंबई, दि.26(डि-24 न्यूज)-
भारत निवडणूक आयोगाच्या आज पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR - Special Intensive Revision) प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासह मतदारांच्या सुलभतेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं ही मुदतवाढ मंजूर केली आहे.
दावे आणि हरकतींसाठी मुदतवाढ:
महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच प्राप्त झालेल्या नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबर 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
बीएलओ (BLO) घरी जाऊन कागदपत्रं संकलित करणार:
पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान 'जुळणी न झालेले मतदार' (Unmapped) किंवा 'तार्किक विसंगती' (Logical Discrepancies) या कारणास्तव ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः जाऊन आवश्यक दस्तऐवज संकलित करतील.
सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही:
दस्तऐवज घरूनच संकलित केले जाणार असल्यानं अशा मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या (AERO) कार्यालयात जाण्याची आवश्यकता असणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीनं सुनावणी घेतली जाईल. या सुनावणीला मतदाराच्या वतीनं कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकेल.
बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्र निवाऱ्यांमध्ये (Night Shelters) राहणाऱ्या नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष व शिबिरं:
राज्यातील बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्र निवाऱ्यांमध्ये (Night Shelters) राहणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी आणि दुरुस्तीत सुलभता यावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEO) गरजेनुसार विशेष मदत कक्ष (Help Desks) आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
What's Your Reaction?