ग्रामीण पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई, 11 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात ग्रामीण पोलिसांची धडक छापेमारी; जुगार व गांजा विक्री अड्ड्यांवर कारवाई, 11.50 लाखापेक्षा अधिकचा चा मुद्देमाल जप्त..
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- जिल्ह्यात छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अवैध धंदे चालकांवर वचक निर्माण करण्यासह जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक यांनी सक्त निर्देश दिले असुन या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पोलीस ठाण्यांच्या मार्फेत गोपनीय माहिती संकलित करून जुगार अड्डे, अमली पदार्थांची अवैध विक्री आणि अन्य बेकायदेशीर व्यवसायांच्या ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
त्यानुसार दिनांक 23/11/2026 रोजी सिल्लोड ते भवन रस्त्यावरील एच.पी. पेट्रोलपंपाच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम एकत्र जमून पैश्यांवर तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता काही इसम गोलाकार बसून पैशांवर तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी अचानक छापमारुन कारवाई करत 9 ईसमांना जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 26,400, रोख रक्कम 7 मोबाईल फोन आणि 14 मोटारसायकली, जुगाराचे साहित्य असा एकूण 10,02,400/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचदरम्यान सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे डोंगरगाव शिवारातही महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 3 आरोपींना ताब्यात घेतले, तर अन्य 3 आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून 4,720, रोख रक्कम 4 मोबाईल फोन आणि 1 मोटारसायकल असा एकूण 1,15,820 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन स्वतंत्र कारवायांमध्ये 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून जुगारासाठी वापरण्यात येणाऱ्यासाहित्यासह 15 मोटरसायकल, 31,120/-रोख रक्कम आणि 11 मोबाईल फोन असा एकुण 11,18,220/- रुपयांचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
तसेच दिनांक 21/11/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयासिंग राजपूत यांना गोपनीय बातमीदारामार्फत करमाड येथे एक महिला गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, करमाड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सक्षम अधिकारी, रासायनिक विश्लेषक, पंच आणि एफएसएल पथकाच्या उपस्थितीत करमाड येथील बेबी संतोष साळुंके (वय 50 वर्षे, रा. करमाड, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) हिच्या राहत्या घरी छापा टाकला असता तिने घरामध्ये पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये हिरवट व काळपट रंगाचा उग्र वास असलेला एकूण 1 किलो 419 ग्रॅम सुका गांजा विक्रीच्या उद्देशाने साठा करून स्वतःच्या ताब्यात बाळगत असल्याचे आढळून आले. सदरचा गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची अंदाजे किंमत 70,950 इतकी आहे. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 530/2026 अन्वये एनडीपीएस अधिनियम 1985 चे कलम 8(क) व 20(ब)(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाड पोलीस करीत आहेत.
नमुद कारवाई ही प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, प्रशांत स्वामी,अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयासिंग राजपूत , पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस हवालदार सचिन राठोड, सुनील गोरे, गोपाल पाटील, संतोष डोंगरे, पोलीस अंमलदार बलबीरसिंग बहुरे, शिवाजी मगर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. करमाड येथील गांजा विक्रीप्रकरणीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने कारवाई केली आहे.
What's Your Reaction?