महाराष्ट्र ग्रामीण बँक जाळणारी टोळी गजाआड...! पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांची माहिती

महाराष्ट्र ग्रामीण बँक जाळणारी टोळी गजाआड...
स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.22(डि-24 न्यूज)
वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी करण्यासाठी जिलेटीनचा स्फोट करुन बँक जाळणाऱ्या 5 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या टोळीने बँकेत चोरी करण्यासाठी नाशिक येथून खरेदी केलेली कार पोलिसांनी जप्त केली असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय ज्ञानेश्वर कराळे (28 वर्ष), रा. करंजगाव ता. वैजापूर, भरत शिवाजी कदम, रा. विरगाव ता. वैजापूर, सचिन सुभाष केरे (25 वर्ष), रा. गवळी शिवरा ता. गंगापूर, वैभव उर्फ गजु पंढरीनाथ केरे (27 वर्ष), रा. गवळी शिवरा ता. गंगापूर, धारबा बळीराम बिराडे (31 वर्ष), रा.अंधोरी ता. अहमदपुर जि. लातूर अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांची नावे आहेत. 20 एप्रिल रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडण्यासाठी कार क्रमांक MH-14-BX-7988 मधून आलेल्या चोरट्यांनी बँकेचे शटर तोडण्यासाठी जिलेटीनचा स्फोट केला होता. बँकेला आग लागल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी कार घटनास्थळी सोडून पोबारा केला होता. बँकेला लागलेल्या आगीत ग्राहकांचे ए.टी.एम. कार्ड, चेक बुक, डी.डी.बुक, कर्ज फाईल, कॅश वाहुचर कॉम्युटर, युपीएस, फर्निचर व दैनंदीन व्यवहाराचे कागदपत्रे असे साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत बँकेचे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक बजरंगलाल जुसालाल ठाका (31 वर्ष), रा. फुलेवाडी, ता. वैजापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतिष वाघ, सहाय्यक निरीक्षक पवन इंगळे, पोलिस अंमलदार भागीनाथ आहेर, विठ्ठल डोके, वाल्मीक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, दिपक सुरोशे, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे आदींच्या पथकाने घटनास्थळी मिळून आलेल्या कारच्या नंबरप्लेट वरुन चोरट्यांचा शोध लावून त्यांना अटक
केली.
What's Your Reaction?






