"हिंद दि चादर" समागमा दरम्यान 33 पार्कींग स्थळे, मोफत पिकअप ड्राॅप आणि कडक वाहतूक नियोजन...
हिंद दि चादर’ समागमा दरम्यान 33 पार्किंग स्थळे, मोफत पिकअप-ड्रॉप आणि कडक वाहतूक नियोजन
नवी मुंबई, दि.28(डि-24 न्यूज)- 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी खारघर येथे ‘हिंद दि चादर’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी व्यापक वाहतूक आणि पार्किंग नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी सुलभ आणि सुरक्षित पोहोच सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
प्रत्येक पार्किंग स्थळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी मोफत पिकअप आणि ड्रॉप सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन पार्क केल्यानंतर भाविकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. ओला-उबरसह सर्व टॅक्सी सेवांसाठी देखील स्वतंत्र पिकअप-ड्रॉप पॉइंट्स निश्चित करण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी सकाळी 6 ते रात्री 11 या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेश व पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. खारघर परिसरात काही मार्गांवर वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली असून पर्यायी मार्गांची निर्मिती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतूक शाखेकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक डीसीपी, एक एसीपी, 20 अधिकारी, 500 अंमलदार आणि 500 वॉर्डन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहन बंद पडण्याच्या शक्यतेचा विचार करून आवश्यक तेथे क्रेन्स तैनात करण्यात आले आहेत.
सर्व पार्किंग स्थळांकडे जाणाऱ्या आणि कार्यक्रमस्थळी येणाऱ्या रस्त्यांवर मार्गदर्शक फलक लावण्यात आले असून, पार्किंगला कलर कोडिंग करण्यात आले आहे. जळगाव, नाशिक, धुळे, ठाणे आदी भागांतून येणाऱ्या वाहनांसाठी ‘आरएफ सिग्नल’ मार्गे प्रवेश देत आरक्षण परिसरात पार्किंगची सोय करण्यात आली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांसाठी ‘ऑरेंज पार्किंग’ निश्चित करण्यात आली असून, ओपेरा ब्रिज व हिरानंदानी मार्गे प्रवेशाची व्यवस्था आहे. मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी ‘पिंक पार्किंग’ची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
एकूणच, भाविकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्वंकष उपाययोजना केल्या असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
आहे.
What's Your Reaction?