अभिजित दिपके दलित विरोधी, वैजापूरच्या घटनेवर सचिन खरात यांची सडकून टीका...

 0
अभिजित दिपके दलित विरोधी, वैजापूरच्या घटनेवर सचिन खरात यांची सडकून टीका...

अभिजित दिपके दलितविरोधी; वैजापूरच्या घटनेवर सचिन खरात यांची सडकून टीका

मुख्य आरोपीला मकोका लावा; रोहित पठारे आणि साहिल वाकोडे यांना न्याय मिळवून देण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 12 (डि-24 न्यूज) : वैजापूर येथील रोहित पठारे हत्या प्रकरण आणि मुंबईतील आयटी विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या घटनेवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे नेते सचिन खरात यांनी काकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जोरदार टीका केली. दलितांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांवर दिपके भूमिका घेत नसल्याचा आरोप करत खरात यांनी त्यांना दलितविरोधी संबोधले.

सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सचिन खरात म्हणाले की, वैजापूर येथील रोहित पठारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची आपण भेट घेतली आहे. रोहित यांना सुमारे एक किलोमीटरपर्यंत पाठलाग करून मारहाण करण्यात आली. त्यांनी पाणी मागितले असता त्यांच्याशी अमानुष वर्तन करण्यात आले. बर्फ तोडण्याच्या टोचननेही त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आरोपींनी कुटुंबातील महिलांनाही मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्याप अटक झालेली नसल्याचा दावा करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी खरात यांनी केली.

मुंबईतील आयटी विद्यार्थी साहिल वाकोडे याचा महाविद्यालयात जातीय कारणावरून छळ करण्यात आल्याचा आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा आरोपही खरात यांनी केला. साहिलचे आई-वडील आणि पत्नी आझाद मैदानावर न्यायासाठी आंदोलन करत असताना या प्रकरणाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अभिजित दिपके यांना इतर विषयांवर आंदोलन करण्यासाठी वेळ मिळतो; मात्र वैजापूर येथे जाऊन रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी वेळ मिळत नाही, अशी टीका खरात यांनी केली. नेहा बोरा आणि नितीन चंदनशिवे यांच्याप्रमाणेच अभिजित दिपके यांचीही समाजाने भूमिका ओळखावी, असे ते म्हणाले.

आपल्या कुटुंबाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी जुना संबंध असल्याचे सांगत, माझ्या आजोबांनी बाबासाहेबांसोबत काम केले असून त्यांना फेडरेशनमध्ये पदही देण्यात आले होते. त्यामुळे मला आंबेडकरवाद शिकवण्याची गरज नाही. मी आंबेडकरवादी असून संविधान आणि कायद्यावर माझा विश्वास आहे, असे खरात यांनी स्पष्ट केले.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासन चालत असल्याचे सांगितले जाते. मात्र, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनत असल्याचा आरोप त्यांनी केला. जातीय अत्याचार आणि हत्याकांड रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अभिजित दिपके यांच्यावर टीका केल्यानंतर आपल्याला धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अशा धमक्यांना आपण घाबरत नाही. कोणाला वैचारिक लढा द्यायचा असेल तर समोर येऊन द्यावा. मारहाणीवर माझा विश्वास नाही. मी संविधान आणि न्यायव्यवस्थेचा आदर करणारा आहे, असेही खरात म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow