नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत बिडकीनच्या खेळाडूंची चमक, सुवर्ण,कांस्य, रौप्य पदक
नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत बिडकीनच्या खेळाडूंची चमक; दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 4 (डी-24 न्यूज) : नेपाळमधील चितवन जिल्हा, सुरहा येथे 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ओपन इंटरनॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये बिडकीनच्या तायक्वांदो संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत 19 देशांतील सुमारे 800 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रोशन खान यांच्या आयोजनाखाली झालेल्या या स्पर्धेत भारतासह सौदी अरेबिया, श्रीलंका, व्हिएतनाम, कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, चीन, दुबई, तैवान, मलेशिया, बांगलादेश, हाँगकाँग, थायलंड, कझाकस्तान, उझबेकिस्तान, नेपाळ, भूतान, नागालँड आणि इंडोनेशिया येथील खेळाडूंनी सहभाग घेतला.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन तायक्वांदो संघाच्या पाच खेळाडूंनी पदकांची कमाई करत भारताचे नाव उंचावले. यामध्ये सार्थक कृष्णा राठोड आणि हुमायून हाफिज इमरान यांनी सुवर्णपदक, आर्यन किशोर राठोड याने रौप्यपदक, तर अर्श सुफियान कुरेशी आणि अर्श अनीस शेख यांनी कांस्यपदक पटकावले.
तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी आणि प्रशिक्षणासाठी डॉ. हाफिज इमरान यांना बेस्ट इंटरनॅशनल कोच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बिडकीनच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
What's Your Reaction?