प्रतिजैविक औषधांचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी फार्मासिस्टनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

 0
प्रतिजैविक औषधांचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी फार्मासिस्टनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

प्रतिजैविक औषधांचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी फार्मासिस्टनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय सोहळा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 3 (डि-24 न्यूज) : प्रतिजैविक औषधांचा अनावश्यक व अयोग्य वापर हे सार्वजनिक आरोग्यासमोरील गंभीर आव्हान आहे. या औषधांचा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापर टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. औषधांचा योग्य व सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी फार्मासिस्टनी सक्रिय भूमिका घ्यावी. प्रत्येक फार्मसी हे रुग्णांना औषधविषयक योग्य माहिती व मार्गदर्शन देणारे विश्वासार्ह केंद्र बनले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे केले.

भारतीय फार्मसी परिषद, एमजीएम विद्यापीठाचा औषधनिर्माणशास्त्र विभाग आणि वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताह 2026 निमित्त एमजीएम रुग्णालयातील रुक्मिणी सभागृहात राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतीय फार्मसी परिषदेचे अध्यक्ष डॉ. माँटू कुमार पटेल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. यशवंत घारपुरे, वॉकहार्ट रिसर्च सेंटरचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. सचिन भागवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले की, प्रतिजैविक प्रतिकार अर्थात अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स ही समस्या केवळ एका रुग्णापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित आहे. प्रतिजैविक औषधांचा अनावश्यक वापर, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, स्वतःहून उपचारपद्धती बदलणे किंवा निर्धारित उपचार अपूर्ण ठेवणे यामुळे सूक्ष्मजीवांमध्ये औषधांप्रती प्रतिकारक्षमता निर्माण होते. परिणामी सामान्य संसर्गावर उपचार करणेही कठीण होऊ शकते. त्यामुळे औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसारच होणे आवश्यक आहे.

आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्ट हा रुग्ण आणि आरोग्यसेवा यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. औषधांची गुणवत्ता, योग्य मात्रा, वापरण्याची पद्धत, उपचाराचा कालावधी आणि संभाव्य दुष्परिणाम याबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी फार्मासिस्टनी पार पाडावी. डॉक्टरांच्या सूचनेनुसार उपचार पूर्ण करणे, स्वतःहून औषधे बंद न करणे आणि उरलेली औषधे इतरांना न देणे याबाबतही जनजागृती करावी. प्रतिजैविक प्रतिकाराच्या समस्येवर मात करण्यासाठी शासन, भारतीय फार्मसी परिषद, शैक्षणिक संस्था, औषधनिर्मिती उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्राने समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या आयुष उपचारपद्धती आरोग्य संवर्धन आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत योगदान देत आहेत. पारंपरिक आरोग्यविषयक ज्ञानाचा आधुनिक विज्ञानाच्या आधारे अभ्यास करताना औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेच्या संशोधनाधारित मूल्यमापनाला प्राधान्य दिले पाहिजे. आधुनिक वैद्यक आणि आयुष उपचारपद्धतींमध्ये समन्वय साधताना वैज्ञानिक पुरावे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि औषध संशोधनामुळे फार्मसी क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होत आहेत. या बदलांनुसार अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. भारतीय फार्मसी परिषद आणि शैक्षणिक संस्थांनी औषध सुरक्षा, रुग्ण मार्गदर्शन व प्रतिजैविक प्रतिकार प्रतिबंधावर अधिक भर द्यावा. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाचा उपयोग सामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी करावा. औषधांचा जबाबदारीने वापर ही केवळ नियमांची बाब नसून भावी पिढ्यांच्या आरोग्याशी संबंधित सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून ‘स्वस्थ भारत, समर्थ महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी केले.

फार्मसी शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञान व औद्योगिक प्रशिक्षणावर भर – डॉ. माँटू कुमार पटेल

भारतीय फार्मसी परिषदेचे अध्यक्ष डॉ. माँटू कुमार पटेल यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बी. फार्मा अभ्यासक्रमात क्लिनिकल फार्मसी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. फार्मसी शिक्षण आणि औषध उद्योग यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी इंडस्ट्री-अ‍ॅकॅडेमिया अ‍ॅडव्हायझरी बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावे, औद्योगिक प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी परिषद प्रयत्नशील आहे. एम. फार्मा विद्यार्थ्यांच्या जीपॅट शिष्यवृत्तीसाठी 200 कोटी रुपये आणि संशोधन व कौशल्य केंद्रांसाठी 80 कोटी रुपयांच्या तरतुदीची माहिती त्यांनी दिली. औषधांचा सुरक्षित वापर आणि प्रतिजैविक प्रतिकार रोखण्यासाठी फार्मासिस्टनी रुग्णांना मार्गदर्शन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास भारतीय फार्मसी परिषदेचे सदस्य डॉ. श्रीकांत जोशी, प्रकाश वंजारी, डॉ. संजय तोष्णीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. एम. एच. देहगन, डॉ. हेमंत जैन, डॉ. स्वरूप लाहोटी यांच्यासह विविध फार्मसी संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी भारतीय फार्मसी परिषदेच्या वृत्तपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. डॉ. विलास सपकाळ व डॉ. संजय तोष्णीवाल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिजैविक प्रतिकार प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध

उपक्रमांत सहभाग घेतला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow