हर्सुल कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ड्राय वेस्ट सेंटरला आग, अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने अनर्थ टळला
हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ड्राय वेस्ट सेंटरला आग...
अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या हद्दीतील हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारात आज सकाळी सव्वाचार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ड्रायवेस्टच्या (Drywastes) शेडला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने तातडीने सूत्रे हलवत घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 15,000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या या शेडमध्ये सिमेंट फॅक्टरीत पाठवण्यासाठी प्रक्रिया करून साठवून ठेवलेला ड्रायवेस्ट होता. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने काम सुरू केले, सुमारे 4 गाड्या आणि पाण्याचे टँकर्स यांच्या साहाय्याने अथक प्रयत्न करून सकाळी 8:30 ते 9:00 वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर दिवसभरात धूर पूर्णपणे शमवून परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्यात आला. या दुर्घटनेत प्रकल्पाचे पत्रे काही प्रमाणात प्रभावित झाले असून, प्री-सॉर्टिंग आणि बेलिंग मशिनचे व शेडचे किरकोळ नुकसान झाले आहे. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग) नंदकिशोर भोंबे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तर महापौर , उप महापौर आणि सभापती यांनी दूरध्वनीवरून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत यंत्रणेला योग्य त्या मार्गदर्शक सूचना दिल्या. महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा, पथक आणि पाण्याचे टँकर्स तात्काळ कामाला लागल्यामुळे आग इतरत्र पसरण्यापूर्वीच यशस्वीरीत्या रोखण्यात आली. महापालिकेच्या या तत्परतेमुळे मोठा धोका टळला आहे. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून आयुक्तांनी अग्निशामक उपाययोजना अधिक बळकट करण्याबाबत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अहवाल सादर करण्याचे आदेश उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांना दिले आहेत. प्रकल्पात काम करणाऱ्या संबंधित एजन्सीच्या (‘मायो एस.एस.’) जबाबदारीची निश्चिती करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.
सध्या हर्सूल डेपो येथील ओल्या कचऱ्याचे प्रोसेसिंग युनिट पूर्णपणे सुरळीत सुरू असून, ड्रायवेट्सच्या प्री-सॉर्टिंग परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली आहे.
सत्ताधारी भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी हर्सुल कचरा प्रक्रिया केंद्राला लागलेल्या आगीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ठेकेदार आणि कचरा प्रक्रिया कामगारांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. आग शाॅर्ट सर्कीटमुळे लागली की लावण्यात आली याची चौकशी प्रशासनाने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काँग्रेसचे शहर चिटणीस मोईन शेख हर्सुलकर यांनी कचरा प्रक्रिया केंद्र शहराच्या 20 किलोमीटर दुर असायला हवे असा प्रदुषण मंडळाचा नियम आहे. या कचरा प्रक्रिया केंद्रामुळे रहीवासी त्रस्त झाले आहेत ते शहराबाहेर स्थलांतरित करावे येथे तलाव असल्याने परिसरातील पाणी कच-यामुळे दुषित होत आहे. कचरा प्रक्रिया केंद्राला आगीच्या घटनेमुळे परिसरात धुर पसरल्याने श्वास घेण्यास नागरिकांना त्रास होत होता. मनपा प्रशासनाने येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी केली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे उप अग्निशमन अधिकारी विजय राठोड, हरिभाऊ घुगे, लक्ष्मण कान्हे, दिपक गंगावणे, दिपक गाडेकर, अजय कोल्हे, प्रशांत गायकवाड, मनसूख सपकाळ, उमेश भोसले, अशोक बेलदोडे, अब्दुल वासे, योगेश दुधे, सुरज राठोड, हरिश पवार यांनी परिश्रम घे
तले.
What's Your Reaction?