योगेश वाघमारे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न...
योगेश वाघमारे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 19 (डी-24 न्यूज) : रोहित पठारे प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात यावा, तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून न्यायप्रक्रियेला गती द्यावी, या मागणीसाठी काही तरुणांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने बुधवारी (दि. 18 नोव्हेंबर) योगेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
रोहित पठारे प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी आणि न्यायप्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, या मागणीसाठी तरुण उपोषणाला बसले होते. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने योगेश वाघमारे यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुमारे पाऊण तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आणि योगेश वाघमारे यांनी उडी मारण्याचा प्रयत्न थांबविला.
या सर्व घडामोडींनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज पुन्हा सुरू झाले. रोहित पठारे प्रकरणात न्याय मिळावा आणि आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
What's Your Reaction?