खड्डे बुजवण्यासाठी काँग्रेसचे गांधिगिरी आंदोलन करताच महापालिकेची यंत्रणा सक्रिय, अर्ध्या तासात आंदोलनस्थळी पोहोचली गाडी

 0
खड्डे बुजवण्यासाठी काँग्रेसचे गांधिगिरी आंदोलन करताच महापालिकेची यंत्रणा सक्रिय, अर्ध्या तासात आंदोलनस्थळी पोहोचली गाडी

दिल्लीगेट पोलीस चौकीसमोरील खड्ड्याविरोधात गांधीगिरी आंदोलन; फुलांची उधळण करताच महापालिकेची यंत्रणा सक्रिय

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28 (डि-24 न्यूज): दिल्लीगेट पोलीस चौकीसमोरील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी व शहराध्यक्ष मिर्झा जकी बेग यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अनोखे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात फुलांची उधळण करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असून, पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनली असल्याचे आंदोलकांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत महापालिकेची यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. आंदोलन सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात महापालिकेची पॉटहोल पॅचिंग मशीन (Pot Hole Patching Machine) घटनास्थळी दाखल झाली आणि दिल्लीगेट पोलीस चौकीसमोरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला.

आंदोलनाला तत्काळ यश मिळाल्यानंतर काँग्रेस दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष मुदस्सर अन्सारी यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. याच धर्तीवर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरातील धोकादायक खड्डे तातडीने बुजवून शहर खड्डेमुक्त करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow