शहरातील ऐतिहासिक तटबंदीलगतची अतिक्रमणे हटविण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश...!

 0
शहरातील ऐतिहासिक तटबंदीलगतची अतिक्रमणे हटविण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश...!

ऐतिहासिक तटबंदीलगतची अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश

पर्यटनवृद्धीसाठी 'टुरिझम कॉरिडोर' प्रस्ताव तयार करण्याचे आयुक्त अमोल येडगे यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- शहरातील ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसेच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश आज वारसा जतन समितीच्या बैठकीत देण्यात आले. ही बैठक आयुक्त दालनात समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत शहरातील ऐतिहासिक तटबंदी, संरक्षण भिंती व परिसरातील अतिक्रमणांचा आढावा घेण्यात आला. विद्यमान नियमांनुसार तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश अध्यक्ष जयंत देशपांडे आणि आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना दिले.

तसेच शहरातील ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी भिंती आणि इतर वारसास्थळांवर उगवलेले गवत व झाडाझुडपे तातडीने काढून स्वच्छता करण्याचे निर्देशही देण्यात आले. या कामाची जबाबदारी संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली.

शहराला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाच्या जतनासोबतच पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने 'टुरिझम कॉरिडोर'चा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी सादर करण्याचे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.

याशिवाय, हेरिटेज सेस मधून जमा झालेल्या सुमारे 46 लाख रुपयांच्या निधीतून शहरातील जुन्या पाण्याचे बंबांची संवर्धनाची कामे INTACH (Indian National Trust for Art and Cultural Heritage) यांच्या माध्यमातून करण्यास समितीने तत्त्वतः सहमती दर्शविली.

या बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक नगररचना मनोज गर्जे, शहर अभियंता संजय कोंबडे, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तानपुरे, सहाय्यक नगररचनाकार कौस्तुभ भावे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या डॉ. शिल्पा जामगडे, रजनीश कुमार, राज्य पुरातत्त्व विभागाचे व्ही. पी. राठोड, INTACH चे मुकुंद भोगले, तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow