लग्नाचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक, मुख्य आरोपीला अहिल्यानगरमधून अटक...

 0
लग्नाचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक, मुख्य आरोपीला अहिल्यानगरमधून अटक...

लग्नाचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक; मुख्य आरोपीला अहिल्यानगरमधून अटक

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- लग्नासाठी मुलगी दाखवून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर बनावट लग्न लावून पाच लाख रुपये उकळल्याचा प्रकार बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुनील खेमकर याला पोलिसांनी तत्काळ तपास करून अहिल्यानगर येथील धनगर वस्ती परिसरातून पळून जात असताना पकडले.

याप्रकरणी लक्ष्मण कन्नू गोळे (वय 30, रा. वारसवाडा, ता. अंबड, जि. जालना) यांनी तक्रार दिली आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. लग्नासाठी मुलगी दाखवून त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले आणि कोमल राजू पवार हिच्याशी बनावट लग्न लावून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ही घटना 14 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान वानखेडेनगर, एन-13 येथे घडली. याप्रकरणी 26 नोव्हेंबर रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 428/2026, भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(2), 318(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू करून सुनील खेमकर याला अहिल्यानगर येथून अटक केली. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई बेगमपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुभाष डेडवाल, शैलेश नलवाडे आणि उमेश चव्हाण यांच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow