"नशा छोडेंगे मैदान मे उतरेंगे" या घोषवाक्यासह IJ FEST-3 ची घोषणा, 3 जानेवारीपासून आमखास मैदानावर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
‘नशा छोडेंगे, मैदान में उतरेंगे’ या घोषवाक्यासह IJ-FEST-3 ची घोषणा; 3 जानेवारीपासून रंगणार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 13 (डि-24 न्यूज) : नवीन वर्षाच्या सुरुवातीला शहरातील तरुणांना नशेपासून दूर ठेवून क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने ‘नशा छोडेंगे, मैदान में उतरेंगे’ या विशेष घोषवाक्यासह IJ-FEST-3 चे आयोजन करण्यात येणार आहे. जानेवारी 2027 मध्ये होणाऱ्या या महोत्सवाची घोषणा माजी खासदार इम्तियाज जलील यांचे सुपुत्र हमजा इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील आणि आयजे फेस्टचे कमिशनर आबिद यांची उपस्थिती होती.
यावेळी हमजा जलील यांनी महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. 3 जानेवारी 2027 पासून फूड फेस्टिव्हलला सुरुवात होणार असून, हा महोत्सव 26 जानेवारीपर्यंत चालणार आहे. तर विविध क्रीडा स्पर्धांना 7 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
क्रिकेट स्पर्धेतील विजेत्याला 10 लाखांचे पारितोषिक
क्रिकेट स्पर्धा 7 ते 16 जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार असून, प्लेइंग इलेव्हनमध्ये बाहेरील दोन खेळाडूंना खेळण्याची संधी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, 19 ते 23 वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंना संघात स्थान देऊन त्यांच्या कामगिरीनुसार विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. फ्रँचायझी पद्धतीने स्थानिक खेळाडूंनाही आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला 10 लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बाईकसह विविध स्वरूपातील एकूण 30 लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.
फुटबॉल स्पर्धेत देशभरातील संघांना संधी
फुटबॉल स्पर्धा 16 ते 23 जानेवारी 2027 या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेत देशातील कोणत्याही राज्यातील संघांना सहभागी होता येणार असून, एकूण आठ संघ मैदानात उतरणार आहेत. प्रथम विजेत्या संघाला 5 लाख रुपये आणि चषक, तर उपविजेत्या संघाला 2.5 लाख रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. याशिवाय खेळाडूंच्या कामगिरीनुसार विविध स्वरूपातील एकूण 20 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
पहिल्यांदाच नातिया मुकाबल्याचे आयोजन
IJ-FEST-3 चे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे यंदा पहिल्यांदाच नातिया मुकाबल्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 24 जानेवारी रोजी हा मुकाबला होणार असून, यासाठी जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध नातख्वान दानिश आणि दावर यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात येणार असून, 26 जानेवारी रोजी कव्वालीच्या मुकाबल्याने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
क्रीडा स्पर्धा, खाद्य महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवून सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करण्याचा IJ-FEST-3 चा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
What's Your Reaction?