शाळेत दररोज एक तास खेळासाठी, मोबाईलवर खेळू नका - जिल्हाधिकारी दिलिप स्वामी

 0
शाळेत दररोज एक तास खेळासाठी, मोबाईलवर खेळू नका -  जिल्हाधिकारी दिलिप स्वामी

राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळा...

मुलांनो भरपूर खेळा; पण मैदानावर…मोबाईलवर नव्हे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- खेळल्याने शारिरीक मानसिक स्वास्थ सुधारते, खिलाडू वृत्ती वाढीस लागते. त्यामुळे मुलांनो भरपूर खेळा… पण मैदानावर; मोबाईलवर नव्हे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज विद्यार्थ्यांना खेळण्याचा मंत्र दिला. तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘ दररोज एक तास खेळासाठी’ हा उपक्रम सुरु करीत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

 हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त विभागीय क्रीडा संकूलात आज प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक प्राचार्य यांना प्रोत्साहनपर अनुदान धनादेश वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू अनिता चव्हाण, डॉ. केदार रहाणे, उद्धव टकले, शशिकांत वडाप तसेच मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, प्राचार्य खेळाडू आदी उपस्थित होते.

प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. 

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, हल्ली मोबाईलच्या वापरामुळे मैदाने ओस पडली आहेत. मुले खेळतात पण ते मोबाईल मधले गेम असतात. हे अपेक्षित नाही. मैदानावर खेळ खेळल्याने आपले शारिरीक स्वास्थ्य सुदृढ होते. मानसिक स्वास्थ्य सुधारते. जय पराजय पचवण्याची क्षमता निर्माण होते. शालेय जीवनातील हे क्रीडा विषयक अनुभव पुढे आयुष्यातील विविध प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी कामात येतात. आपल्या देशात मुला मुलींनी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवावे. क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना आयुष्यात प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतात. शासनातर्फे त्या उपलब्ध करुन दिल्या जातात. त्यामुळे शालेय जीवनापासून क्रीडा कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संकृती निर्माण करण्यासाठी ‘दररोज एक तास खेळासाठी’ हा उपक्रम जिल्ह्यात सुरु करीत असल्याचेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी जाहीर केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी प्रास्ताविक केले. उपसंचालक शेखर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

दोन दिवस उपक्रम...

याच उपक्रमांचा भाग म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शनिवार दि.30 रोजी सकाळी साडे 10 वा. देवगिरी महाविद्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे व्याख्यान होणार आहे. तर रविवार दि.31 रोजी सकाळी 8.30 वा. विभागीय क्रीडा संकूल येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow