एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई सुरू, काय म्हणाले विरोधीपक्षनेते...
एमआयएमच्या नगरसेवकांवरील अपात्रेची कार्यवाही सुरू, विरोधीपक्षनेते समीर साजिद म्हणाले आम्ही कायदा हातात घेतला नाही, शिविगाळ केली नाही...
आयुक्त जी श्रीकांत म्हणाले अपात्रतेची कारवाई सुरू, अहवाल शासनाकडे पाठवणार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाला काही दिवसांपूर्वी शहागंज येथे शिवीगाळ करून अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एमआयएमच्या 11 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे अशी माहिती आज महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
आयुक्त म्हणाले की, महापालिका निवडणूकीत निवडून आलेल्या एमआयएमच्या (मजलिस -ए-इत्तेहादूल मूस्लिमिन) नगरसेवकांविरोधात सर्वाधिक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शहागंज येथे रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू असताना, एमआयएमच्या नगरसेवकांनी शहागंजमध्ये येऊन मनपाच्या पथकाला कारवाई करण्यापासून रोखले, यावेळी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत, धमकावले. यावेळी काही नगरसेवकांचे नातेवाईकही होते. या घटनेनंतर त्या 11 नगरसेवकांसह नगरसेवकांच्या नातेवाईकांविरोधात 30 ते 40 जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित नगरसेवकांना लवकरच नोटिस बजावण्यात येईल. त्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्याची कारवाई सुरू केली जाईल.
रील आणि हेसुद्धा पुरावेच- मनपा आयुक्त जी श्रीकांत...
एमआयएम नगरसेवकांचे शिष्टमंडळ भेटायला आले होते. काही लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला, तर काहींनी आम्ही त्या ठिकाणी नव्हतो, असेही सांगितले आहे. त्याचीही तपासणी करण्यात येईल. या घटनेचे व्हिडिओ व इतर पुरावे आमच्याकडे आहेत. तसेच हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेवकांनीच रिल तयार करून सोशल मिडियावर व्हायरल केलेली आहे. ते व्हिडिओसुद्धा पुरावे आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनही चौकशी करत आहे. मनपा प्रशासनही तपासणी करत आहे. चौकशीनंतर अपात्रतेची कारवाई प्रस्तावित केली जाईल.
त्या तक्रारींचीही चौकशी सुरू
महापालिका निवडणुकीनंतर अनेक नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. यात तीन अपत्य असणे, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण आणि महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारीअर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात खोटी माहिती देणे आदी तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारींच्या अनुषंघाने चौकशी सुरू केली आहे.,असेही आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले.
विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर काय म्हणाले...
शहरातील लाखो मतदारांनी आम्हाला निवडून दिले आहे. शहागंज येथील अतिक्रमण कारवाई आम्ही बाधित केली नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महापालिका एक्टनुसार काम करायला हवे. आम्ही अतिक्रमण हाटावो पथकाला किंवा अधिकारी यांना शिविगाळ केली नाही. अतिक्रमण नियंत्रण अधिकारी हे नगरसेवकांना अधिकार नसताना बोलले. महापौर किंवा आयुक्त बोलत असेल किंवा कारवाई करत असतील तर कायद्याने उत्तर देवू. आम्हाला जनतेच्या कामासाठी निवडून दिले आहे त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे चूक आहे का असा सवाल विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी उपस्थित केला आहे.
What's Your Reaction?