स्मारकाऐवजी रुग्णालयाचा लढा जिंकणारे इम्तियाज जलिल, जनहितासाठीच्या संघर्षाची सर्वत्र चर्चा...!
स्मारकाऐवजी रुग्णालयाचा लढा जिंकणारे इम्तियाज जलील; जनहितासाठीच्या संघर्षाची सर्वत्र चर्चा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24 न्यूज)- राजकारणात अनेक नेते निवडणुका जिंकतात, पदे मिळवतात आणि सत्तेतही सहभागी होतात. मात्र जनतेच्या आयुष्यात कायमस्वरूपी सकारात्मक बदल घडवून आणणारे लोकप्रतिनिधी फारच कमी असतात. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी राखीव असलेली सरकारी जमीन महिला व बाल रुग्णालयासाठी उपलब्ध व्हावी, यासाठी दीर्घकाळ संघर्ष करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शहराला स्मारकाची अधिक गरज आहे की रुग्णालयाची, असा प्रश्न उपस्थित करत इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा जनहिताचा असल्याचे सातत्याने मांडले. त्यांच्या या भूमिकेवर टीका झाली, हेतूंवर शंका घेतली गेली आणि धर्माच्या आधारावरही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी कोणत्याही टीकेला न जुमानता न्यायालयीन आणि कायदेशीर मार्गाने आपला लढा सुरू ठेवला.
या संघर्षाचे फलित आज 400 खाटांचे महिला व बाल रुग्णालय शहरात उभे राहिले आहे. भविष्यात हजारो गरीब कुटुंबांना या रुग्णालयाचा लाभ होणार असून, असंख्य माता सुरक्षित प्रसूती करतील, नवजात बालकांचे प्राण वाचतील आणि अनेक कुटुंबांना नवजीवन मिळणार आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांच्या नावाचा उल्लेख होईल किंवा नाही, यापेक्षा लोकांच्या मनात स्थान मिळवणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या रुग्णालयाच्या उभारणीमागे एका लोकप्रतिनिधीची दूरदृष्टी, जिद्द आणि जनहितासाठी केलेला संघर्ष असल्याची नोंद इतिहासात कायम राहील, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.
इम्तियाज जलील यांच्या या संघर्षाने स्मारकापेक्षा माणसांचे जीव अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश दिल्याची चर्चा सध्या शहरात रंगत आहे. हे रुग्णालय काही दिवसांत रुग्णसेवेसाठी सज्ज होणार आहे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कर्मचारी भरतीसाठी शासकीय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
What's Your Reaction?