शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांना निवेदन सादर...!
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांना निवेदन...
"अलायन्स अगेन्स्ट क्राईम" तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन; "गुन्हेमुक्त शहर" अभियानाची घोषणा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- शहरातील वाढत्या खूनाच्या घटना, अमली पदार्थांची तस्करी, टोळीगिरी, अवैध शस्त्रे आणि इतर गंभीर गुन्ह्यांविरोधात अलायन्स अगेन्स्ट क्राईम, या शहरस्तरीय महासंघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने खूनाच्या गुन्ह्यांचा प्रभावी तपास, अमली पदार्थांच्या रॅकेटचा बंदोबस्त, संवेदनशील भागात गस्त वाढविणे, टोळीगिरीवर कठोर कारवाई, अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम आणि लक्झरी बसमार्गे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.
पोलीस आयुक्तांनी कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे तसेच नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारी नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी "गुन्हेमुक्त शहर अभियान" (Crime Free City Campaign) सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांमध्ये अभियान, अमली पदार्थविरोधी मोहिमा, नागरिक-पोलीस संवाद, युवकांसाठी मार्गदर्शन, परिसरस्तरीय बैठका आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
शहरातील सर्व नागरिक, युवक, व्यापारी, शिक्षक, सामाजिक संस्था आणि धार्मिक संघटनांनी या अभियानात सहभागी होऊन छत्रपती संभाजीनगरला सुरक्षित, शांततापूर्ण आणि गुन्हेमुक्त शहर बनविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
या शिष्टमंडळात मुस्तफा खान, आदिल मदनी, जुनैद फारुकी, फिरोज पठाण, अब्दुल राफे सय्यद, इरशाद अली, सय्यद तनवीर, आमेर अहमद खान, मुर्तजा खान, मुझफ्फर सिद्दीकी आणि माज सिद्दीकी उपस्थित होते.
What's Your Reaction?