कटकट गेट येथे अनधिकृत नळजोडणी कारवाई दरम्यान दगडफेक व हाणामारी, पोलिस बंदोबस्तात होणार पुढील कारवाई...!
कटकट गेट येथे अनधिकृत नळजोडणी कारवाईदरम्यान दगडफेक अन् हाणामारी... पोलीस बंदोबस्तात अनधिकृत जोडण्यांवर हातोडा पडणार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बाधा आणणाऱ्या अनधिकृत नळजोडण्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, आज रविवारी शालिमार हॉटेल तसेच कट कट गेट ते पोलीस मेस रोड परिसरात अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला आज स्थानिकांमधील वाद, दगडफेक आणि हाणामारीच्या प्रकाराला सामोरे जावे लागले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आता संबंधित भागातील कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य जलवाहिनीवरून अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडण्या घेण्यात आल्याने शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा जोडण्या शोधून त्या खंडित करण्यासाठी महापालिकेने विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
याच मोहिमेअंतर्गत शालिमार हॉटेल आणि कट कट गेट ते पोलीस मेस रोडवरील मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या तोडण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, त्याचवेळी परिसरातील नागरिकांमध्ये आपापसात वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर दगडफेक आणि हाणामारीत झाले. परिणामी, कारवाईसाठी गेलेल्या पथकासमोर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने खबरदारीची भूमिका घेतली आहे. यानंतर संबंधित भागातील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतरच राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अनधिकृत नळजोडण्यांविरोधातील कारवाईला आता पोलीस संरक्षणाचे कवच मिळणार आहे.
या कारवाईत पथकप्रमुख तथा कनिष्ठ अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता अक्षय डुकले यांच्यासह लाईनमन, नागरी मित्र पथकाचे रतन वाघ, किसन निकम, संतोष बनकर, नारायण फुके, स्वर्णसिंह परदेशी, जनार्दन सांगळे, जयेश मगरे तसेच स्वप्नील पाईकडे, वैभव भटकर, ऋतिक वाघमारे, कुणाल कांबळे, तुषार पोटपिल्लेवार, रितेश परोचा आणि सागर गायकवाड उपस्थित होते.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या हटविणे आवश्यक असल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घे
तली आहे.
What's Your Reaction?