प्रमाणिक रिक्षाचालकाचा आदर्श, दोन लाख रुपये किंमतीचा हरवलेला आयपाॅड मालकाला केला परत...!
प्रामाणिक रिक्षाचालकाचा आदर्श; दोन लाख रुपये किमतीचा हरवलेला आयपॅड मालकाला परत!
सेवन हिल उड्डाणपुलावर सापडलेला टॅब जिन्सी पोलिसांकडे केला जमा; पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांच्या हस्ते रिक्षाचालकाचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 26 (डि-24 न्यूज) : प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत एका रिक्षाचालकाने सुमारे दोन लाख रुपये किमतीचा हरवलेला आयपॅड (टॅब) पोलिसांच्या स्वाधीन केला. सय्यद खमर सय्यद शमशोद्दीन (रा. मिसारवाडी) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक सय्यद खमर सय्यद शमशोद्दीन हे आपल्या रिक्षाने जालना रोडवरून जात असताना त्यांना सेवन हिल उड्डाणपुलावर एक टॅब पडलेला आढळून आला. त्यांनी कोणताही विलंब न करता तो टॅब उचलून जिन्सी पोलीस ठाण्यात आणून जमा केला.
दरम्यान, काही वेळाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील सरकारी अभियोक्ता पवन लखोटिया हे आपला आयपॅड हरवल्याची तक्रार देण्यासाठी जिन्सी पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांनी त्यांना सेवन हिल उड्डाणपुलावर हरवलेला आयपॅड एका रिक्षाचालकाला सापडला असून, त्याने तो प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात जमा केल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित आयपॅडची खात्री करून तो पवन लखोटिया यांच्याकडे सुपूर्द केला. महत्त्वाची माहिती असलेला आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचा आयपॅड सुखरूप परत मिळाल्याने लखोटिया यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
या प्रामाणिकपणाची दखल घेत पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांनी रिक्षाचालक सय्यद खमर सय्यद शमशोद्दीन यांना पोलीस ठाण्यात बोलावून शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
रिक्षाचालकाने दाखविलेल्या या प्रामाणिकपणामुळे समाजात माणुसकी आणि नैतिक मूल्यांची जाणीव पुन्हा अधोरेखित झाली असून, त्यांच्या या कृतीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
What's Your Reaction?