विमानात प्रवाशाची प्रकृती बिघडली, डॉ.भागवत कराड यांची तत्परता, रुग्णाला दिलासा
विमानात प्रवाशाची प्रकृती बिघडली; डॉ. भागवत कराड यांची तत्परता, रुग्णाला दिलासा
नवी दिल्ली, दि. 3 (डि-24 न्यूज) : मिझोरम दौऱ्यासाठी दिल्लीहून आइजोलकडे रवाना झालेल्या IndiGo 6E 291 या विमानातील एका प्रवाशाची अचानक प्रकृती गंभीर झाल्याची घटना घडली. यावेळी विमानात उपस्थित असलेले माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा डॉक्टर डॉ. भागवत कराड यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता प्रवाशाच्या मदतीसाठी धाव घेतली.
प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कराड यांनी डॉक्टर म्हणून आवश्यक वैद्यकीय मदत केली. विमानातील उपलब्ध ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून प्रवाशाला ऑक्सिजन देण्यात आला. त्यामुळे प्रवाशाला प्राथमिक स्वरूपात वैद्यकीय दिलासा मिळाला.
दरम्यान, विमान आइजोल येथे पोहोचल्यानंतर विमानतळावर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. प्रवाशाला ऑक्सिजनसह तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या संपूर्ण प्रसंगात डॉ. भागवत कराड यांनी कोणतेही पद किंवा राजकीय ओळख न पाहता डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य बजावले. संकटाच्या प्रसंगी तातडीने मदतीला धावून जाण्याची त्यांची तत्परता, संवेदनशीलता आणि सेवाभाव यामुळे प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला.
संकटाच्या क्षणी माणुसकीला प्राधान्य देत डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावण्याचे डॉ. भागवत कराड यांचे हे उदाहरण चर्चेचा विषय ठरले आहे.
What's Your Reaction?