शहर पोलिसांची PIT NDPS अंतर्गत पहिली कारवाई, आदिल चाऊस चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध

 0
शहर पोलिसांची PIT NDPS अंतर्गत पहिली कारवाई, आदिल चाऊस चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध

मराठवाड्यात PIT NDPS कायद्यांतर्गत पहिली कारवाई; अमली पदार्थ तस्कर आदिल चाऊस चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28 (डी-24 न्यूज) – अमली पदार्थांची अवैध विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. मराठवाड्यात प्रथमच PIT NDPS Act-1988 अंतर्गत कारवाई करत आदिल हमद चाऊस (वय 36, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर) याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची रवानगी चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

आदिल चाऊस याच्याविरुद्ध चरस, गांजा, एमडी (मेफेड्रोन) तसेच इतर अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात सहा गुन्हे, तर इतर कायद्यांनुसार 20 गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थांची अवैध खरेदी-विक्री, साठवणूक, वाहतूक व वितरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईसाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी 18 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानबद्धतेचे आदेश दिले होते. त्यानुसार 27 नोव्हेंबर रोजी आदिल चाऊस याला ताब्यात घेऊन चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अटलकर (परिमंडळ-1), पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख (शहर विभाग) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पुनम पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर (गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक प्रवीण यादव, एपीआय सचिन जाधव, पीएसआय उमेश्वर मुंडे, पीएसआय मारुती मेदवाड, पोलीस कर्मचारी पोहेकॉ भगवान शिलाटे, पोहेकॉ दिपाली सोनवणे, पायधन, चव्हाण, पोहेकॉ महादेव दाणे, छाया लांडगे, जाधव, मेटे, सुंदरडे, सरताज पठाण, मोरे आणि पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध पोलिसांची ही महत्त्वपूर्ण कारवाई असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow