अतिवृष्टीमुळे नुकसान, राज्य सरकार तात्काळ मदत देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 0
अतिवृष्टीमुळे नुकसान, राज्य सरकार तात्काळ मदत देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी अथकपणे काम करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन_

 अतिवृष्टीमुळे नुकसान; राज्य सरकार तात्काळ मदत देणार

 2023 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची गतीने अंमलबजावणी_

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17 (डि-24 न्यूज)- मराठवाड्याची सर्वांगिण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषि, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन कार्यक्रमात दिली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दियानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलातर्फे शस्त्र सलामी, मानवंदनेनंतर ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, प्रशांत बंब, प्रदीप जयस्वाल, विलास भुमरे, आमदार श्रीमती संजना जाधव, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त प्रविण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठा लढा उभारला, यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई 

श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंगजी चव्हाण, भाऊसाहेब वैंशपायन, शंकरसिंग नाईक, विजेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे, काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्धन होरटीकर गुरुजी, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर अशा अनेक जणांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घेऊन काम केले. त्यांच्यासोबत असंख्य लोकांनी रझाकारांच्या जुलमातुन मराठवाड्याला मुक्त केलं आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या निष्पत्तीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 13 महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला मुक्ती मिळाली आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे तर एकसंघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो. या सर्व लोकांचा आदर ठेवत मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अतिवृष्टीमुळे नुकसान; राज्य सरकार तात्काळ मदत देणार...

मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून अतिवृष्टीमध्ये आपले बंधू-भगिनी दगावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ मदत देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी किंवा गावकरी त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली.

मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ करायचा आहे, यासाठी कृष्णा खोऱ्यातले पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणले. दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचे पुराचे पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आणण्यात येणार आहे. उल्हास खोऱ्याचे 54 टीएमसी पाणीदेखील मराठवाड्यामध्ये आणण्यात येईल. गोदावरीचे खोरे आहे जे तुटीचे खोरे आहे हे खोरे त्यातली तूट दूर करून यासंदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचे काम निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून केले जाईल. डिसेंबरपर्यंतचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी- फेब्रुवारी मध्ये याचे निविदा प्रक्रिया पार पाडली जाईल असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

2023 मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची गतीने अंमलबजावणी

छत्रपती संभाजीनगर येथे 2023 मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची गतीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

घृष्णेश्वर मंदिराला 61 कोटी रुपये दिले आहेत, तुळजाभवानी मंदिर 541 कोटीची तरतूद केली तर औंढा नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली आहे. मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत 94 बसगाड्या दिल्या असून छत्रपती संभाजीनगरला जवळपास 115 बसेस दिल्या आहेत. 916 अंगणवाड्यांची सुरुवात केली, 2600 नवीन बचतगट तयार करून त्यामध्ये 2.70 लाख महिलांना जोडले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेचे अंतर्गत 95 कोटीचा निधी वितरित केला. विविध स्मारके, मंदिरे यासाठी 253 कोटी रुपये दिले, 3121 कोटीच्या रस्त्यांची कामे सुरू केली, जी प्रगतीपथावर आहेत. हायब्रिड ॲन्युनिटीमधील 7719 कोटींची कामे आपण सुरू केली, बीड जिल्हा परिषदेच्या इमारतीचे 70 टक्के काम पूर्ण केले आहे. जवळपास चार लाख सिंचन विहिरी पैकी 30 हजार विहिरी पूर्ण केल्या, आणि 1.14 लाख एवढ्या सिंचन विहिरीचे काम सुरू केले आहे. मंत्रिमंडळाची बैठक ही केवळ एक औपचारिकता नव्हती तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयावर कार्यवाही करण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी 2700 कोटी रुपयांची योजना सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा ८०० कोटीचा हिस्सा देखील या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसीमुळे आज सर्व गुंतवणूकदारांना अतिशय महत्त्वाचे स्थान ज्याला आपण आवडीचे स्थान म्हणू शकतो ते आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे. ह्युंडाई कंपनीची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हेच दर्शवते. काही वर्षांमध्ये झालेली गुंतवणूक पाहिली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक वाहनांच्यासाठी देशाची राजधानी बनते आहे. 

लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. जवळपास १४ हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच नाही तर मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चालले आहे ते विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. अहिल्यानगर पासून बीड पर्यंतची रेल्वेचे स्वप्न हे आज पूर्ण करण्याचे काम आपल्या शासनाच्या माध्यमातून होत आहे. 

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सरकार मराठवाड्याच्या हितासाठी आणि मराठवाड्याच्या प्रगतीसाठी काम करत राहील आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना या आमच्यासाठी अत्यंत मोलाच्या ठरतील, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या स्वतंत्र संग्राम सेनानींची भेट घेऊन त्यांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, नागरिक, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow