शहरात 8 रस्त्यांची पाडापाडी पुन्हा सुरू होणार, नगरसेवकांनी कार्यवाईत अडथळा आणला तर पद रद्द होणार...!

 0
शहरात 8 रस्त्यांची पाडापाडी पुन्हा सुरू होणार,  नगरसेवकांनी कार्यवाईत अडथळा आणला तर पद रद्द होणार...!

शहरात पुन्हा 8 रस्त्यांची पाडापाडी, नगरसेवकांनी अडथळा आणला तर पद रद्द होणार...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - आता महापालिका निवडणूक संपली, निकाल आले, महापालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश, नियम व सर्वेक्षणाच्या आधारावर शहरातील प्रमुख 8 रस्त्यांचा श्वास मोकळा करुन रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण कारवाईत नगरसेवक तथा त्यांच्या नातेवाईकांनी अडथळा निर्माण केला तर पद रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. सोमवारी मनपा प्रशासन व पोलीस अधिकारी यांची बैठक झाली यामध्ये कारवाई होण्याच्या आठ दिवस अगोदर कळवावे पोलीस बंदोबस्त दिला जाईल असे पोलीस प्रशासनाने बैठकीत सांगितले.

गेल्या वर्षी जून-जुलै महीन्यात शहरात मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरण मोहीम राबवली होती यामध्ये पाच हजार हुन अधिक मालमत्तेवर मनपा प्रशासनाने बुलडोझर फिरवला होता. आता अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. दोनशे फुट रुंदीचे रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेला तीन हजार कोटी रुपये लागणार आहे शासनाकडे निधीची मागणीही करण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरण मोहीम थांबलेली नाही, काही दिवसांत आठ मुख्य रस्ते रुंद करणार असे आयुक्त जी.श्रीकांत यांनी सोमवारी बैठकीनंतर स्पष्ट केले.

महानगरपालिका निवडणुकीमुळे रस्ता रुंदीकरण मोहिमेला ब्रेक लागला होता आता 29 प्रभागातून 115 नगरसेवक निवडून आले. 10 फेब्रुवारी रोजी शहराला नवीन महापौर, उपमहापौर मिळेल.

सोमवारी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नाकर नवले उपस्थित होते. शहरातील आठ डिपी रस्ते मोकळे करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भुसंपादनाची प्रक्रिया राबवून अतिक्रमण काढले जाईल त्यासाठी नियमावली ठरली आहे. रुंदीकरण मोहिमेपूर्वी टोटल स्टेशन(बाधित मालमत्तांचा नकाशा) करुन घ्यावा. मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात यावी. त्यावर म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. कार्यवाई पूर्वी झोन अधिकारी, पोलीस उपायुक्त, पोलिस निरीक्षक रस्त्यांचा आढावा घेतील. तिघांचे एकमत झाल्यानंतर कार्यवाहीचे चित्रिकरण केले जाईल. अतिक्रमण हटवताना नगरसेवक किंवा नातेवाईकांनी अडथळा निर्माण केला तर महापालिका अधिनियम 1(10)(अ)(डॉ) नुसार सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली जाईल अनधिकृत बांधकाम कोणाचेही असले तरी पाडले जाईल.

या प्रमुख आठ रस्त्यावर होणार आहे अतिक्रमण हटवण्याची कारवाई...

हर्सुल टि-पाॅईंट ते सावंगी, दिल्ली गेट ते हर्सुल टी-पाॅईंट, चंपा चौक ते जालना रोड, पैठण रोड ते विधी विद्यापीठ, सेवन हिल ते भाजीवाली बाई पुतळा रेणुका माता परिसर, सातारा कांचनवाडी गट-42 नक्षत्रवाडी ते धुळे-सोलापूर हायवे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow