स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये प्रभाग पध्दत रद्द करा - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रभाग पद्धत रद्द करा अन्यथा न्यायालयात जावू - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कमी-अधिक उमेदवार निवडून येत असतात. पण, प्रभाग रचनेमुळे एकही उमेदवार निवडून आला नाही. 4 उमेदवारांचा एक प्रभाग होऊन एकगठ्ठा मतदानामुळे लहान पक्षांवर अन्याय होत आहे. त्यामुळे प्रभाग रचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. अन्यथा, प्रभाग रचनेविरोधात ‘रिपाइं’ न्यायालयात दाद मागेन, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपाने दिलेल्या आश्वासनानुसार ‘रिपाइं’ला स्वीकृत नगरसेवकपद तरी द्यावे, असे आठवले म्हणाले.
मागिल दोन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शुक्रवारी शहरात जागतिक बौध्द धम्म परिषदेला उपस्थित राहिले. लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात कर्मचाऱ्यांनी चोरीचा आळ घेऊन केलेल्या मारहाणीनंतर अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीने गळफास घेतला. तिला दलित म्हणून मारहाण केल्याचा आरोप आहे. तिने आत्महत्या केली नसून फाशी दिल्याचे तिच्या आईने सांगितले. औसा तालुक्यातील टाका गावात तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. तसेच पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन सत्यस्थिती जाणून घेतली. या प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे’, असे आठवले यांनी सांगितले. बिहार राज्यातील गया येथील महाविहार ट्रस्टवर 1949 च्या कायद्यानुसार 4 बौद्ध, 4 हिंदू आणि अध्यक्षपदी जिल्हाधिकारी असतात. मात्र, ट्रस्टवर सर्व बौद्ध असावेत अशी आमची मागणी आहे. याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे, असे आठवले यांनी सांगितले.
उत्तम प्रशासक असलेल्या अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली असून त्यानुसार चौकशीचा निर्णय होईल. आमदार रोहीत पवार, अमोल मिटकरी यांनी विमान कंपनीवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात घातपात असावा का याची चौकशी करावी. मात्र, राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे अजित पवार यांची हत्या झाली असे वाटत नाही, असे आठवले म्हणाले. येत्या 3 एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपणार आहे. पण, तिसऱ्यांदा आपली राज्यसभेवर निवड होईल याची खात्री आहे. आणखी 6 वर्ष मिळाल्यास जोमाने काम करू, असे आठवले यांनी सांगितले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, पप्पू कागदे, ज्येष्ठ नेते दौलत खरात, राज्य कार्यकारणी सदस्य किशोर थोरात, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, संजय ठोकळ, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, दिलीप पाडमुख, कुंदन लाटे, मुकुंद घोरपडे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?