जन्म प्रमाणपत्रासाठी मागितली लाच, महापालिकेच्या खाजगी कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
जन्म प्रमाणपत्रासाठी 5 हजारांची लाच स्वीकारताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- मुलाचे जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या झोन-7 विभागातील खासगी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 5) दुपारी करण्यात आली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कुणाल मनोहर कविकर (वय 27, रा. प्लॉट क्र. 102, गजानन नगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो महानगरपालिकेच्या झोन-7 विभागात खासगी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.
तक्रारदाराने मुलाच्या जन्म प्रमाणपत्रासाठी महानगरपालिकेत अर्ज केला होता. प्रमाणपत्र काढून देण्यासाठी आरोपी कुणाल कविकर याने सुरुवातीला 6 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 5 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. बुधवारी दुपारी महानगरपालिका झोन-7 कार्यालयात आरोपीने 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात राजेंद्र नंदीले, सचिन बारसे, रामेश्वर ताठे यांचा समावेश होता. या कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास तत्काळ एसीबीकडे तक्रार करावी.
What's Your Reaction?