स्वदेश उत्पादनांना प्रोत्साहन देत विकसित भारताचा संकल्प पुढे नेण्याची गरज - केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

 0
स्वदेश उत्पादनांना प्रोत्साहन देत विकसित भारताचा संकल्प पुढे नेण्याची गरज - केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देत विकसित भारताचा संकल्प पुढे नेण्याची गरज - केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे

‘स्वदेशी एक्स्पो 2026’चे श्रीमती खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर, दि. 14 :- स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. देशातील कला, हस्तकला व पारंपरिक कारागिरीला योग्य व्यासपीठ मिळाले, तर त्यातून कलाकारांना रोजगाराच्या संधी मिळतील व स्वदेशी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रत्येकाने स्वदेशी उत्पादनांचा अधिकाधिक वापर करून देशाच्या विकासात योगदान द्यावे. स्वदेशीला प्रोत्साहन देत आपण सर्वांनी एकत्रितपणे विकसित भारताचा संकल्प पुढे नेला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय व शिखाज् कारागिरी संस्थेच्यावतीने सागर रिसॉर्ट, एमआयडीसी येथे आयोजित ‘स्वदेशी एक्स्पो 2026’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण, सेवानिवृत्त सचिव सुमंत भांगे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू विलास सपकाळ, केंद्रीय सूचना प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी संतोष देशमुख, कैलास अजमेरा, संतोष अजमेरा, शिखा अजमेरा, विवेक देशपांडे आदी उपस्थित होते.

श्रीमती खडसे म्हणाल्या, तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात भारतीय कला व संस्कृतीचे आधुनिक स्वरूपात सादरीकरण करणे आवश्यक आहे. आपल्या कला व स्वदेशी उत्पादनांचा देशात व जगभर प्रचार करण्याची जबाबदारी भारतीय म्हणून आपलीच आहे. पारंपरिक कलेला आधुनिक रूप, प्रभावी प्रचार-प्रसार व योग्य बाजारपेठ मिळाल्यास ती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकते.

पारंपरिक कलेमागील इतिहास, कलाकारांची मेहनत व उत्पादनाचे वैशिष्ट्य समजून घेऊन नागरिकांनी अशा कलाकृतींना प्रोत्साहन दिले पाहिजे. कलेचे आधुनिक रूपांतर, प्रभावी विपणन व योग्य बाजारपेठ यांच्या माध्यमातून चांगले व्यवसाय प्रारूप उभे राहू शकते. मात्र, या प्रक्रियेत पारंपरिक कलाकार व त्यांच्या कलेचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कलाकार ही देशाची खरी ताकद असून, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशातील लोककला, हस्तकला व पारंपरिक कारागिरी जतन करण्यासोबत स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. युवक व महिला उद्योजकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवउद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र शासनाच्या माध्यमातून युवक, महिला व उद्योजकांना सातत्याने प्रोत्साहन व सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिखा अजमेरा म्हणाल्या, कारागीर, उद्योजक आणि ग्राहक हे कलेच्या विकासातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्थानिक कलाकारांच्या मेहनतीचा सन्मान करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे काम या प्रदर्शनातून होणार आहे.

विवेक देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी केंद्र शासनाच्या केंद्रीय संचार विरो माहिती व प्रसारण मंत्रालयाचे पंजीकृत लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था यांच्या पथकाने गणेशवंदना व महाराष्ट्र गीतांचे सादरीकरण केले. 

हे प्रदर्शन दि. 14 ते 16 ऑगस्ट 2026 या कालावधीत तीन दिवस चालणार असून, देशभरातून 75 हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत. नागरिकांसाठी प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य आहे. या प्रदर्शनातील 75 टक्क्यांहून अधिक प्रदर्शक हे महिला उद्योजक व लघुउद्योगांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा

प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow