"ईव्हीएम हटवा शिक्षण वाचवा " शहरात 27 सप्टेंबरला हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार...!
ईव्हीएम हटवा, शिक्षण वाचवा; भारतीय विद्यार्थी महारॅली 27 सप्टेंबरला... राज्यस्तरीय आक्रोश महामोर्चाची हाक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- ईव्हीएम मशीन, शिक्षणाचे खाजगीकरण, शिक्षणविरोधी धोरणे आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय आक्रोश महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महारॅली सकाळी 11 वाजता क्रांती चौक येथून सुरू होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा नेण्यात येणार आहे.
भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या म्हणण्यानुसार, भारतीय संविधान लागू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला समानता, न्याय आणि शिक्षणाचा अधिकार मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षांत सरकारी शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शिक्षणाचे वाढते खाजगीकरण, सरकारी शाळांची घटती संख्या, पेपरफुटी, शिक्षकांची अपुरी भरती तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा राज्यस्तरीय आक्रोश महारॅली आयोजित करण्यात आली आहे. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता हजारोंच्या संख्येने महारॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जयशिल कांबळे यांनी केले आहे. असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या विद्यार्थ्यांच्या महारॅलीत दहा ते बारा हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख मागण्या...
ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर पद्धत लागू करावी.
NEET/SSC-CGL आदी सर्व स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या विरोधात कारवाई करून दोषींना तत्काळ शिक्षा करावी.
NEP-2020 रद्द करावे.
NTA मार्फत परीक्षा घेणे बंद करावे.
MPSCच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने सरकारी यंत्रणेमार्फत घ्याव्यात तसेच निकाल व भरती प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावी.
स्वाधार शिष्यवृत्ती व इतर सर्व शिष्यवृत्ती महागाई भत्त्यानुसार दरमहा विद्यार्थ्यांच्या खात्यावर वितरित कराव्यात.
सर्व प्रकारच्या कंत्राटी भरती बंद करावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या PES सोसायटी व त्याअंतर्गत येणाऱ्या शाळा, महाविद्यालये व हॉस्टेलची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
स्पर्धा परीक्षा पेपरफुटीविरोधात कठोर कायदे करावेत.
केंद्र व राज्य सरकारी विभागांमध्ये रिक्त पदांची तत्काळ भरती सुरू करावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित वसतिगृहामध्ये प्रवेश द्यावा.
शेड्युल्ड ट्राईब (आदिवासी) विद्यार्थ्यांच्या विरोधात काढलेले जी.आर. तत्काळ रद्द करावेत तसेच आदिवासी शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या प्रकरणांची तत्काळ चौकशी करावी.
या महामोर्चात विद्यार्थी, युवक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय विद्यार्थी मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?