आसिफिया काॅलनीत 39 अनाधिकृत नळ कनेक्शन कट केल्याने खळबळ...दहा हजारांचा दंड वसूल

 0
आसिफिया काॅलनीत 39 अनाधिकृत नळ कनेक्शन कट केल्याने खळबळ...दहा हजारांचा दंड वसूल

आयुक्तांच्या पाहणीनंतर धडक कारवाई

आसिफिया कॉलनीत 39 अनधिकृत नळ जोडण्या खंडित

10 हजारांचा दंड वसूल...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. आज सकाळी मनपा आयुक्त अमोल येडगे शहर पाहणी दौऱ्यावर असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी वाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले.

आयुक्तांच्या निर्देशानुसार बेगमपुरा रोडवरील घाटी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या आसिफिया कॉलनी परिसरात विशेष कारवाई करण्यात आली. परिसरातील 250 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या आणि रस्त्यावर पाणी वाहून जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तब्बल 39 अनधिकृत नळ जोडण्या मनपा पथकाने खंडित केल्या. तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त-2 कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता मिलिंद भामरे, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, पथक अभियंता रोहित इंगळे यांच्यासह अनधिकृत नळ शोध पथकाचे कर्मचारी आणि नागरी सहाय्यक पथक या कारवाईत सहभागी झाले.

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्या तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणी हे सार्वजनिक संपत्ती असून त्याचा अपव्यय किंवा बेकायदेशीर उपसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला

आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow