व्हाईट पेपर परीक्षा केंद्राचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 0
व्हाईट पेपर परीक्षा केंद्राचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

200 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; व्हाईट पेपर परीक्षा केंद्राचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22 (डी-24 न्यूज) : व्हाईट पेपर परीक्षा केंद्राच्या वतीने सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकूण 200 गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये डॉ. इंद्रजीत आल्टे (माजी UPSC सदस्य), डॉ. म्हात्रे (चित्रपट दिग्दर्शक), डॉ. स्मिता अवचार (सेवानिवृत्त प्राध्यापक, BAMU विद्यापीठ), अरुण देशपांडे (अध्यक्ष, ऑल इंडिया कन्झ्युमर फोरम), शारेक नक्शबंदी (संपादक, एशिया एक्सप्रेस), बाबासाहेब घुगे, सय्यद ख्वाजा मोहिउद्दीन, मिर्झा दाऊद आझाद तसेच दौलतराव मोरे (सेवानिवृत्त उपपोलीस अधीक्षक) यांची उपस्थिती होती.

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी बुशरा फातिमा वसीर खान हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला प्रथम पारितोषिक म्हणून 11 हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय अन्य 10 गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांसह एकूण 200 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.

यावेळी व्हाईट पेपर परीक्षा केंद्राचे सीएमडी सुरेंद्र जाधव यांनी केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. NEET, JEE आणि MHT-CET यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणे वातावरण उपलब्ध करून देणे हा व्हाईट पेपर परीक्षा केंद्र सुरू करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नियमित साप्ताहिक परीक्षा, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव परीक्षा (फुल लेंथ पेपर), प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन तसेच विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे सविस्तर विश्लेषण केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासातील कमतरता ओळखून त्यावर सुधारणा करण्याची संधी मिळते. परिणामी प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी समन्वयन सुरेंद्र जाधव, बेग साहेब, श्रद्धा तिभे आणि सय्यद रिजवान अहमद यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी व्हाईट पेपर परीक्षा केंद्राच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाप्रती समर्पित राहून सातत्याने मेहनत करावी, असे आवाहन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला. प्रेरणादायी वातावरणात हा भव्य पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow