अवैध प्लाॅटींग व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

 0
अवैध प्लाॅटींग व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

शास्तीवर शंभर टक्के सूट योजनेचा व्यापक प्रचार करा – आयुक्त अमोल येडगे

 अवैध प्लॉटिंग व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश...

वाहतुकीस अडथळा ठरणारे व धोकादायक होर्डिंग त्वरित हटवा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- सर्व प्रकारच्या मालमत्तांवरील थकीत मालमत्ता कराची एकरकमी रक्कम भरल्यास शास्तीवर शंभर टक्के सूट देण्याच्या योजनेचा नागरिकांमध्ये व्यापक प्रचार करून थकीत मालमत्ता कराची संपूर्ण वसुली करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी आज दिले.

आज दुपारी महानगरपालिका मुख्यालयात सर्व सहाय्यक आयुक्त, इमारत निरीक्षक, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त श्री. येडगे यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

शास्तीमाफी योजनेचा व्यापक प्रचार करा... 

आयुक्त म्हणाले की, प्रत्येक सहाय्यक आयुक्तांनी शास्तीमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे आणि थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहाय्यक आयुक्तांकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच, मालमत्ता कर वसुली करताना दुबार नोंद झालेल्या मालमत्तांची पडताळणी करून अशा नोंदी नियमानुसार वगळण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 अवैध प्लॉटिंग व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा...

शहरातील अवैध प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांचा आढावा घेताना आयुक्तांनी प्रत्येक सहाय्यक आयुक्त व इमारत निरीक्षकांनी आपापल्या प्रभागात सुरू असलेल्या अवैध प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांवर नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. अशी प्रकरणे निदर्शनास येताच संबंधितांना तातडीने नोटीस बजावून बांधकामाचे काम थांबविण्याची कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

निर्माणाधीन इमारतींबाबत बोलताना आयुक्त म्हणाले की, ज्या इमारती नियमानुसार नियमित करता येणे शक्य आहे, त्यांना नियमानुसार नियमित करण्याची प्रक्रिया राबवावी. मात्र, ज्या इमारती नियमित करता येणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. शहरातील एकाही प्रभागात अवैध प्लॉटिंग किंवा अनधिकृत बांधकाम होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, प्लॉटिंग किंवा निर्माणाधीन इमारतींसाठी परवानगी घेण्यात आली आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी नगररचना विभागामार्फत बीपीएमएस (BPMS) प्रणालीचा वापर करण्याबाबत पुढील आठवड्यात सहाय्यक आयुक्त व इमारत निरीक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

अनधिकृत होर्डिंग व फलकांवरील कारवाई तीव्र करा...

शहरातील अनधिकृत होर्डिंग व फलकांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. प्रत्येक प्रभागात नियमितपणे अशी कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी बैठकीत दिली. विशेषतः वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे तसेच प्रथमदर्शनी धोकादायक वाटणारे होर्डिंग तातडीने हटविण्याची कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.

सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, सनियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहूळे, नगररचनाकार कौस्तुभ भावे, उपायुक्त अतिक्रमण सविता सोनवणे आदींची उपस्थिती होती.

शास्ती माफी योजनेअंतर्गत दहा दिवसात तीन कोटी कर जमा 

आयुक्त महोदयांनी दिनांक 06.11.2026 पासून मालमत्ता करांवरील विलंब शास्तीमधे 100% माफीची योजना जाहीर केली आहे. 

गत वर्षी जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत 95% विलंब शास्ती माफी योजना लागू होती. या कालावधीत सुमारे 60 हजार थकबाकीदार नागरिकांनी 118 कोटी रुपये एवढा कर भरणा केला होता. 

तर यावर्षी योजना जाहीर झाल्यापासून 10 दिवसातच 1650 मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घेतला व सुमारे 3.00 कोटी रुपये एवढा करभरणा केला आहे.

त्या अनुषंगाने आज मनपा आयुक्त श्री अमोल येडगे यांनी सहाय्यक आयुक्त झोन 1 ते 10 यांची आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व उप आयुक्त श्री विकास नवाळे उपस्थित होते. बैठकीत आयुक्तांनी योजनेचा उद्देश्य स्पष्ट केला व प्रत्येक मालमत्ता धारकापर्यंत याची माहिती पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. योजनेला बळकटी देण्यासाठी व टारगेटेड काम होण्यासाठी, कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांच्या निश्चित कोणत्या वर्गाला लक्ष्य करायचे आहे ते आयुक्त महोदयांनी निश्चित करून दिले. गतवर्षी कर भरणा केलेल्या परंतु यावर्षी अद्याप करभरणा ना केलेल्या 48586 मालमत्ताधारकांकडून रु.116.01 कोटी एवढा महसूल अपेक्षित आहे. गेल्या चार ते पाच वर्षात नवीन कर आकारणी झालेल्या 25298 मालमत्ताधारकांकडे रु.65.88 कोटी एवढा कर थकीत आहे. त्याच बरोबर मागील पाच वर्षात फक्त एकदाच कर भरलेल्या व इतर कर थकीत असलेल्या नागरिकांची संख्या 6831 असून त्यांच्याकडे रु. 45.31 कोटी एवढी थकबाकी आहे. या सर्व श्रेणीतील मालमत्ता धारकांच्या याद्या आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त व उप आयुक्त यांनी झोन कार्यालयास उपलब्ध करून दिल्या आहेत. झोन कार्यालयातर्फे थकबाकीदारांना शास्ती माफी योजनेची माहिती व नोटीस देण्यासोबतच आवश्यकता पडेल तेथे जप्ती व अटकावणीची कार्यवाही करून मालमत्ता कर वसूल केला जाणार आहे. या सर्व आकडेवारी व्यतिरिक्त आयुक्तांनी सर्व झोन कार्यालयांना स्वतंत्र प्रत्येकी रु.05.00 कोटी एवढे कर वसुलीचे अधिकचे उद्दीष्ट दिले आहे. आगामी काळात एकूण 1.65 लक्ष थकबाकीदारांकडून रु.400.00 कोटी एवढी करवसूली करणार असल्याची आशा आयुक्त महोदयांनी व्यक्त केली.सोबतच 100%विलंब शास्ती माफी योजनेचा थकबाकीदार नागरिकांनी लाभ घ्यावा व कर भरणा करून थकबाकीतून मुक्त व्हावे असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow