मदनी चौकाजवळ दोघांवर जीवघेणा हल्ला, एका युवकाचा मृत्यू, आरोपी अटक
जुन्या आर्थिक वादातून रक्तरंजित अंत! दोन सख्ख्या भावांनी ममेऱ्या भावाची हत्या...
मदनी चौकात लोखंडी हातोडा व लाकडी दांडक्याने डोक्यावर हल्ला; घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 31 (डि-24 न्यूज)- जुन्या आर्थिक वादातून दोन सख्ख्या भावांनी आपल्या 32 वर्षीय ममेऱ्या भावावर लोखंडी हातोडा आणि लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी सेंट्रल नाका परिसरातील मदनी चौकात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना काही तासांत अटक केली आहे.
मृतकाचे नाव फेरेस बिन अब्दुल अजीज अलकसेरी (वय 32, रा. पडेगाव) असे आहे. फेरेस हा कुटुंबासह पडेगाव येथे राहत होता. रविवारी सकाळी कामानिमित्त तो त्याचा मित्र सय्यद शहजाद अली (वय 30) याच्यासोबत सेंट्रल नाका परिसरात मनपाची कचरा गाडी घेण्यासाठी आला होता. मदनी चौकात कचरा गाडीच्या सुपरवायझरशी चर्चा करीत असताना अचानक त्याचे नातेवाईक अहमद खलील बादाम (वय 40) आणि अदनान खलील बादाम (वय 35, दोघे रा. बारी कॉलनी) तेथे आले.
जुन्या आर्थिक वादातून वाद वाढला
जुन्या आर्थिक वादाचा विषय काढून आरोपींनी फेरेसला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढून हातघाई झाली. याचदरम्यान अहमद बादाम याने हातातील लोखंडी हातोड्याने फेरेसच्या डोक्यावर व मानेवर जीवघेणे वार केल्याचा आरोप आहे. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी फेरेसने हात पुढे केला असता त्याच्या हातालाही गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, दुसरा आरोपी अदनान बादाम यानेही लाकडी दांडक्याने फेरेसवर हल्ला केला. या हल्ल्यात फेरेस गंभीर जखमी झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा मित्र सय्यद शहजाद अली यालाही मारहाणीत दुखापत झाली.
घाटीत उपचारादरम्यान मृत्यू
घटनेनंतर शोएब आणि शहराब यांनी गंभीर जखमी फेरेस व शहजाद यांना वाहनातून तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. फेरेसवर उपचार सुरू असतानाच रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश ताटे, सहायक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत, सर्जेराव सानप आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला.
काही तासांत दोन्ही आरोपी अटकेत
घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अहमद खलील बादाम आणि अदनान खलील बादाम या दोन्ही भावांना जिन्सी पोलिसांनी काही तासांतच अटक केली. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मनपाच्या कचरा गाडीवर चालक म्हणून कार्यरत
मृतक फेरेस हा महापालिकेच्या कचरा संकलन विभागाच्या झोन क्रमांक 2 मध्ये चालक म्हणून कार्यरत होता. सायंकाळच्या वेळी व्यावसायिक कचरा संकलनाचे काम तो करीत होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी अहमद हा खासगी वाहनचालक असून अदनान हा जिममध्ये काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. जीन्सी पोलीस ठाण्यात उशिरा रात्री खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.
What's Your Reaction?