मलिक अंबर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महमूदपुरा हेरिटेज वॉक, ऐतिहासिक जलव्यवस्था दुर्लक्षित...!
मलिक अंबर यांच्या 400 व्या पुण्यतिथीनिमित्त ‘महमूदपुरा हेरिटेज वॉक’; ऐतिहासिक जलव्यवस्था आणि दुर्लक्षित वारशाची नागरिकांना ओळख...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- निजामशाहीतील दूरदर्शी मंत्री, कुशल प्रशासक आणि तत्कालीन खडकी शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे मलिक अंबर यांच्या 400 व्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पर्यटन विभाग व INTACH छत्रपती संभाजीनगर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘महमूदपुरा हेरिटेज वॉक’चे आयोजन रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले. शहराची ऐतिहासिक जलव्यवस्था, नगररचना, स्थापत्य वारसा आणि महमूदपुरा परिसराच्या इतिहासाची नागरिकांना ओळख करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
हेरिटेज वॉकची सुरुवात नहर-ए-अंबरीच्या प्रमुख ऐतिहासिक स्थळांपैकी एक असलेल्या गोमुख येथून झाली. मलिक अंबर यांनी तत्कालीन खडकी शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देत नहर-ए-अंबरीच्या माध्यमातून शहरासाठी प्रभावी जलपुरवठा व्यवस्था निर्माण केली होती. सुमारे चार शतकांपूर्वी विकसित झालेल्या या जलव्यवस्थेचे ऐतिहासिक महत्त्व आणि तिच्यामागील अभियांत्रिकी कौशल्य याविषयी सहभागी नागरिकांना माहिती देण्यात आली.
INTACH छत्रपती संभाजीनगर चॅप्टरचे सह-संयोजक ॲड. स्वप्निल जोशी यांनी प्रास्ताविक केले. मलिक अंबर यांच्या 400 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित या हेरिटेज वॉकची संकल्पना व उद्देश त्यांनी स्पष्ट केला. शहरातील प्रसिद्ध स्मारकांबरोबरच विविध वस्त्यांमध्ये विखुरलेल्या तुलनेने अपरिचित ऐतिहासिक वास्तू, पारंपरिक जलव्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा यांचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे यांनी वॉकचे मार्गदर्शन केले. त्यांनी नहर-ए-अंबरीची ऐतिहासिक जलव्यवस्था, महमूदपुरा परिसराचा इतिहास, येथील विविध वास्तूंचे ऐतिहासिक व स्थापत्यशास्त्रीय महत्त्व तसेच मलिक अंबर यांच्या नगरविकासातील योगदानाची माहिती सहभागी नागरिकांना दिली.
वॉकदरम्यान नागरिकांनी महमूदपुरा येथील ऐतिहासिक मकबरा तसेच श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर यांना भेट दिली. राजपूत छत्री स्थापत्यशैलीत बांधलेली बारादरी हे या परिसरातील एक वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य असून, तिच्या वास्तुशिल्पीय वैशिष्ट्यांची माहितीही यावेळी देण्यात आली.
या हेरिटेज वॉकला शहराचे महापौर श्री. समीर राजूरकर, सभापती श्री. अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते श्री. अब्दुल समीर साजिद, नगरसेवक श्री. राजगौरव वानखेडे, महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त श्री. रणजित पाटील, महानगरपालिकेच्या पर्यटन विभागाचे उप आयुक्त श्री. अंकुश पांढरे आणि सहाय्यक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पर्यटन विभाग व INTACH छत्रपती संभाजीनगर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या उपक्रमातून शहराच्या सर्वपरिचित स्मारकां पलीकडे असलेल्या महमूदपुरा परिसरातील ऐतिहासिक व स्थापत्य वारशाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. मलिक अंबर यांच्या जलव्यवस्थापन आणि नगरनियोजनाच्या दूरदृष्टीपासून ते परिसरातील विविध स्थापत्य परंपरांपर्यंत शहराच्या बहुपेडी वारशाची ओळख सहभागी नागरिकांना झाली.
शहराच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नागरिक, स्थानिक प्रशासन आणि वारसा संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील अशा प्रकारचे सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश या हेरिटेज वॉकमधू
न देण्यात आला.
What's Your Reaction?