हेल्मेट सक्ती आणि चोराने हेल्मेट घालून लूटले, जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

 0
हेल्मेट सक्ती आणि चोराने हेल्मेट घालून लूटले, जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

रोपळेकर चौकात हेल्मेट घालून आला अन् बळजबरीने बॅग हिसकावली; 12 तासांत आरोपी जेरबंद

जवाहरनगर पोलिसांची कारवाई; 40 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.12(डि-24 न्यूज)-रोपळेकर चौक परिसरात पानटपरी चालकाच्या हातातील बॅग बळजबरीने हिसकावून मोटारसायकलवरून पसार झालेल्या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत मुद्देमालासह जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.

दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी जितेंद्र रणछोडदास वैष्णव (वय 58, व्यवसाय पानटपरी चालक, रा. निरंजन हो.सो., टिळकनगर, उल्कानगरी, छत्रपती संभाजीनगर) हे रोपळेकर चौकाजवळील पानटपरीची साफसफाई करून पानटपरी सुरू करत होते.

यावेळी अचानक लाल-काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून एक हेल्मेटधारी व्यक्ती त्यांच्याजवळ आली. मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याचेही दिसून आले. आरोपीने फिर्यादीजवळ गाडी उभी करून त्यांच्या हातातील पानटपरीच्या सामानाची बॅग बळजबरीने हिसकावली आणि मोटारसायकलवरून पसार झाला.

या बॅगेमध्ये 32 हजार 560 रुपये किमतीचे सिगारेटचे पाकीट, ज्यात गोल्ड फ्लेक, फोर स्क्वेअर, मार्लबोरो, बिडीचे बंडल व माचिसची पाकिटे, 7 हजार 800 रुपये रोख रक्कम तसेच 600 रुपयांचे दराचे पेटीएम व भारत पेचे स्पीकर व स्कॅनर, असा एकूण 40 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल होता.

याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 402/2026, कलम 304 (2) भा.न्या.संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार मारोती गोरे व राजेंद्र शिंदे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीची माहिती मिळवली.

आरोपी सातार परिसरातील नाईक नगर येथे असल्याची माहिती मिळताच ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना देण्यात आली. त्यानंतर सायबर सेलची तांत्रिक मदत घेऊन आरोपीची अधिक माहिती मिळवण्यात आली.

आरोपीचे नाव मनीष दिलीप गोरवाडकर (वय 43 वर्षे, धंदा सिक्युरिटी गार्ड, रा. देवगिरी कॉलनी, सातारा बिड बायपास, छत्रपती संभाजीनगर) असे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने TVS मोटारसायकलवर हेल्मेट घालून बळजबरीने बॅग हिसकावल्याची कबुली दिली.

पोलिस कोठडी; चोरीचा मुद्देमाल जप्त

दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे जवाहरनगर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी

ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-2 श्री. रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त श्री. मनीष कल्याणकर, उसमनपुरा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास अधिकारी :

पोहे/ तडवी

पोअं/ मारोती गोरे

पोअं/ राजेंद्र शिंदे

यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आरोपीला ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow