कायदा हा सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे

 0
कायदा हा सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे

कायदा हा सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना धीर द्या ; संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज ) - कायदा हा केवळ व्यवसाय नसून मानवी स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन आहे. भावी वकिलांनी संविधानाचे रक्षण, सत्याची बाजू मांडणे आणि वंचितांना न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य मानावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी केले.

मराठवाड्यातील शेतकरी सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. या संकटाच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर तसेच शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मुलांवरही या परिस्थितीचा परिणाम होत आहे. त्यामुळे शक्य ते योगदान देऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचे आवाहन न्यायमूर्ती वराळे यांनी केले.

माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्या वतीने तापडिया सभागृहात आयोजित ‘अलीकडील वैधानिक बदल आणि न्यायालयीन निकाल’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. डॉ. कल्पलता पाटील-भारस्वाडकर, प्राचार्या डॉ. अपर्णा कोत्तापल्ले, समन्वयक अभय जाधव, कार्यक्रम समन्वयक अमृता कौर जोहर, व्यवस्थापन व प्रशासकीय परिषदेचे सदस्य, प्राध्यापक, निमंत्रित पाहुणे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

न्यायमूर्ती वराळे म्हणाले, कायद्याच्या अभ्यासात बौद्धिक कुतूहल, नैतिक धैर्य, शिस्त, सचोटी आणि समाजातील दुर्बल घटकांविषयी सहानुभूती जोपासणे आवश्यक आहे. भारतीय संविधानाची ताकद त्यातील तरतुदींइतकीच त्याची अंमलबजावणी करणाऱ्या नागरिक, न्यायाधीश, वकील आणि सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या निष्ठेवर अवलंबून आहे. संविधान हे बदलत्या काळानुसार विकसित होणारे जिवंत दस्तऐवज असून सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा विचार करून त्याचा अर्थ लावला पाहिजे. संविधानाने दिलेली समानता आणि न्यायाची मूल्ये प्रत्यक्ष जीवनात रुजविण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेत वेळेचे महत्त्व वाढले असून तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नव्या कायद्यांमध्ये पीडितांना न्याय देणे, तपासात पारदर्शकता आणणे आणि न्यायालयीन प्रक्रिया गतिमान करण्यावर भर देण्यात आला आहे. शोध व जप्तीचे चित्रीकरण, इलेक्ट्रॉनिक नोंदी आणि न्यायवैद्यक तपासणी यांसारख्या तरतुदींमुळे फौजदारी न्यायप्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, असे त्यांनी सांगितले.

वाचनाची सवय विधी विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे न्यायमूर्ती वराळे यांनी सांगितले. माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या समृद्ध ग्रंथालयाचे त्यांनी कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकांवरील प्रेम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी कायदेविषयक पुस्तकांसोबतच विविध विषयांचे वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ॲड. डॉ. कल्पलता पाटील-भारस्वाडकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी संविधानाचा आदर करावा, सातत्याने वाचन करावे तसेच न्यायालयीन कामकाजाचे निरीक्षण करून कायद्याचे व्यावहारिक ज्ञान मिळवावे. भाषेवर प्रभुत्व, कायदेविषयक संशोधन, कायदेविषयक मदतकार्य आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा विवेकपूर्ण वापर करावा; मात्र वाचन आणि स्वतंत्र विचाराची सवय कायम ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

प्राचार्या डॉ. अपर्णा कोत्तापल्ले व अभय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी 3 वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाच्या 71 व्या आणि 5 वर्षीय बीएएलएलबी अभ्यासक्रमाच्या 43 व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमात ‘आविष्कार’ स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेजल हिलगे व यश वरकड या विद्यार्थ्यांचा न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow