शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, मंजूर कुटुंबाला प्रत्येकी 25 हजार मदत द्या - आमदार रोहित पवार

 0
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार,   मंजूर कुटुंबाला प्रत्येकी 25 हजार मदत द्या - आमदार रोहित पवार

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

चारा छावण्या सुरू करा, शेतमजूर कुटुंबांना 25 हजारांची मदत द्या; विद्यार्थ्यांची परीक्षा व शैक्षणिक फी माफ करण्याचीही मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 23 (डि-24 न्यूज) – मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदत द्यावी, तसेच विद्यार्थ्यांची परीक्षा फी आणि शैक्षणिक फी माफ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सुमारे 35 हजार कोटी रुपयांचे, तर राज्यातील पावसाअभावी झालेल्या पिकांचे सुमारे 80 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. मराठवाड्याच्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर नुकसानीची ही माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

रोहित पवार यांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे 5,800 कोटी रुपये, जालना 5,150 कोटी, बीड 6,000 कोटी, धाराशिव 3,250 कोटी, लातूर 3,800 कोटी, नांदेड 5,500 कोटी, परभणी 4,000 कोटी, तर हिंगोली जिल्ह्यात सुमारे 2,300 कोटी रुपयांचे पिकांचे नुकसान झाले आहे.

मागील वर्षीची मदतही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा दावा

मागील वर्षी ओला दुष्काळ निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी हेक्टरी 17 हजार 500 रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, ही मदत पीक विमा कंपन्यांकडून पूर्णपणे मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी केवळ 27 रुपये, लातूरमध्ये 438 रुपये, धाराशिवमध्ये 8 हजार रुपये, हिंगोलीमध्ये 7 हजार रुपये, परभणीत 3 हजार 700 रुपये, जालन्यात 60 रुपये, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हेक्टरी 236 रुपये पीक विम्याची रक्कम मिळाल्याचा दावा करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील 2020 च्या ओला दुष्काळातील पीक विम्याची सुमारे 800 कोटी रुपये, तर धाराशिव जिल्ह्याची सुमारे 600 कोटी रुपयांची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्र सरकारकडून यासंदर्भात उत्तर आले असले तरी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नसल्याचे ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनींसाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, ती मदतही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पंचनाम्यांबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहावे

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले. काही अधिकारी पीक विमा कंपन्यांना वाचवण्यासाठी ज्या ठिकाणी चांगले पीक आले आहे, तेथील पिकांची पाहणी करण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळण्यासाठी पंचनामे पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी त्यांनी केली.

चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा

दुष्काळग्रस्त भागात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी आणि नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून सरकारवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचा संदर्भ देत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री भेटीसाठी येताना कडक इस्त्री केलेले कपडे घालून येणाऱ्यांना प्रवेश दिला जातो; मात्र शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बॅरिकेड्स लावले जातात, असा आरोप त्यांनी केला.

मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थी, युवक, महिला सुरक्षा आणि रोजगाराचे प्रश्नही गंभीर आहेत. सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पदवीधर निवडणुकीवरही उपस्थित केला सवाल

जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये, यासाठी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या निवडणुका डिसेंबरनंतर जाहीर होणे अपेक्षित होते, मात्र त्यापूर्वीच निवडणुका जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवार द्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

समान नागरी कायद्याला विरोध

सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याची भाषा केली जात असल्याबाबतही रोहित पवार यांनी भूमिका मांडली. विद्यार्थी आणि शेतकरी विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले असताना माध्यमांचे लक्ष या प्रश्नांपासून विचलित करण्यासाठी समान नागरी कायद्याचा मुद्दा पुढे आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

समान नागरी कायद्याचा परिणाम अल्पसंख्याक आणि आदिवासी समाजावर होण्याची शक्यता असल्याने या कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा विरोध राहील, असेही त्यांनी सांगितले.

बीडमध्ये उद्या मोठे आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने उद्या बीड येथे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.

दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील जिल्हाध्यक्षांसह शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, माजी आमदार संजय वाघचौरे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित कदम, नवीन सिंग ओबेरॉय, अॅड. जुबेर मोतीवाला, इलियास किरमानी, आशिष पवार, मुश्ताक अहमद, अयूब पटेल, शेख इरफान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow