विरोधीपक्षनेत्यासह एमआयएमचे 16 नगरसेवकांचे पद धोक्यात, सत्ताधारी भाजपचे 7 नगरसेवकांचा समावेश
विरोधीपक्षनेत्यासह एमआयएमच्या 16 नगरसेवकांचे पद धोक्यात..?; भाजपच्या ७ नगरसेवकांनाही नोटीस
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १ (डी-२४ न्यूज प्रतिनिधी): महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक-2026 मध्ये निवडून आलेल्या काही नगरसेवकांविरोधात बेकायदेशीर बांधकाम, तिसरे अपत्य तसेच इतर अपात्रतेच्या कारणांवरून दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेत महापालिका प्रशासनाने एकूण 23 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये विरोधी पक्ष नेत्यासह एमआयएमच्या 16 नगरसेवकांसह सत्ताधारी भाजपच्या 7 नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिका प्रशासनाने संबंधित तक्रारींची प्राथमिक पडताळणी करून नोटिसा बजावल्या असून, संबंधित नगरसेवकांना आपली बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या पदाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "एमआयएमच्या काही नगरसेवकांना अद्याप नोटीस प्राप्त झालेली नाही. नोटीस मिळाल्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उत्तर सादर केले जाईल. पक्ष कायदेशीर मार्गाने आपली बाजू भक्कमपणे मांडेल. नागरिकांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. एमआयएम शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असून आमचे सर्व नगरसेवक जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहेत."
महापालिका प्रशासनाच्या पुढील सुनावणी व निर्णयाकडे आता संबंधित नगरसेवकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?