"क्राईम फ्री सिटी" अभियानाच्या शिष्टमंडळाने महापौर समीर राजूरकर यांची घेतली भेट...

 0
"क्राईम फ्री सिटी" अभियानाच्या शिष्टमंडळाने महापौर समीर राजूरकर यांची घेतली भेट...

‘क्राईम फ्री सिटी’ अभियानाच्या शिष्टमंडळाची मनपा समीर राजूरकर यांच्याशी भेट...

बेकायदेशीर पार्किंगच्या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी, टोईंग व्हॅनसह नियमित कारवाईची मागणी; जॉगर्स पार्क व खेळाच्या मैदानांसाठीही निवेदन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)-। Alliance Against Crime अंतर्गत सुरू असलेल्या ‘Crime Free City’ अभियानाच्या शिष्टमंडळाने मनपाचे समीर राजूरकर यांची रेल्वे स्टेशन परिसरातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या अभियानाची माहिती दिली.

शिष्टमंडळाने ‘Crime Free City’ अभियानाची उद्दिष्टे आणि आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती समीर राजूरकर यांना दिली. अभियानांतर्गत शहरात जनजागृती, अमली पदार्थांविरोधातील उपक्रम, शाळा-महाविद्यालयांमध्ये जागृती, नागरिक-पोलिस संवाद, युवकांचे मार्गदर्शन तसेच परिसरनिहाय जनसंपर्क अशा विविध माध्यमातून काम केले जात आहे. यापूर्वी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हत्या प्रकरणांच्या तपासाला गती देणे, संघटित अमली पदार्थांच्या नेटवर्कवर तसेच लक्झरी बसच्या माध्यमातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या वाहतुकीवर कारवाई, पोलिसांची गस्त वाढविणे, बेकायदेशीर शस्त्रांविरोधात मोहीम आणि नागरिकांच्या सहभागातून गुन्हेगारीला आळा घालणे आदी मागण्या मांडल्या होत्या.

मनपेशी संबंधित सहकार्याबाबत चर्चा करताना शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे निर्जन स्वरूपाची ठिकाणे निर्माण होत असून, अशा ठिकाणी काही युवक अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिला. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी टोईंग व्हॅनसह विशेष पथक दररोज पाठवून बेकायदेशीर पार्किंगविरोधात नियमित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच मनपाच्या उपलब्ध जागांवर जॉगर्स पार्क आणि मुलांसाठी खेळाची मैदाने (Playgrounds) विकसित करण्यात यावीत, जेणेकरून शहरातील युवक व मुलांना आरोग्यदायी आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध होईल, अशी मागणीही करण्यात आली.

दीड तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या सविस्तर बैठकीत समीर राजूरकर यांनी अभियानाच्या उद्दिष्टांचे तसेच शिष्टमंडळाने मांडलेल्या विविध मुद्द्यांचे सकारात्मक स्वागत केले आणि या उपक्रमासाठी आपल्या स्तरावरून शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नौशाद कुरेशी, हुजैफा खान, आदिल मदनी, फिरोज पठाण, जुनैद फारुकी, इरशाद अली खान, बासित सिद्दीकी, मुर्तजा खान, मुस्तफा खान यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow